नागपूर :- केंद्र शासनाच्या स्वच्छता ही सेवा २०२६ या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शहरातील सर्व 10 झोनमध्ये एक दिवस, एक तास, एक साथ स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या उपक्रमांतर्गत संबंधित परिसरात सामूहिक स्वच्छता मोहीम राबवून परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छ आणि सुंदर नागपूरच्या निर्मितीसाठी स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत श्रमदान केले.

शहरातील 10 झोनमधील 10 ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यात लक्ष्मीनगर झोनमध्ये आयटी पार्क रोड, धरमपेठ झोनमध्ये अंबाझरी उद्यान रोड, हनुमानगर झोनमध्ये बुधवार बाजार परिसर, धंतोली झोनमध्ये कौशल्या नगर रोड, नेहरूनगर झोनमध्ये भांडेवाडी रोड व स्वामी नारायण मंदिर रोड, गांधीबाग झोनमध्ये चिंतेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेला उमिया शंकर शाळा परिसर, सतरंजीपुरा झोनमध्ये मालधक्का रोड, लकडगंज झोनमध्ये सरदार भोला सिंग मैदान, आशीनगर झोनमध्ये कपिल नगर डब्ल्यूसीएल रोड, व मंगळवारी झोनमध्ये मंगळवारी झोन कार्यालय ते मंगळवारी बाजार परिसर नागरिकांच्या श्रमदानातून स्वच्छ करण्यात आला. नागरिकांचा सहभाग, स्वच्छतेची जबाबदारी आणि सामूहिक श्रमदानातून स्वच्छ नागपूरच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. या अभियानामुळे शहरातील विविध भागाची स्वच्छता करण्यात आली.








