हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून, त्यांना ‘मी जेलमध्ये जाऊन आलोय, तुला बघून घेतो’ अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट ऑफिस चौक परिसरात १६ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुधीर देवराव कळमकर हे पोलीस विभागातील वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत आहेत. सोमवारी (दि. १६ मार्च २०२६) सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान ते पोस्ट ऑफिस चौक येथे ड्युटीवर तैनात होते. यावेळी लायब्ररी चौकाकडून दोन तरुण ऍक्टिव्हा (क्र. एम.एच. ३६ वाय ५०३७) वरून वेडेवाकड्या पद्धतीने वाहन चालवत येताना दिसले. कळमकर यांनी त्यांना थांबवले असता, चालक दारूच्या नशेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
वाहन बाजूला उभे करण्यास सांगितले असता, आरोपी मानव मनीष मोगरे (२५) आणि आशू उर्फ दीपांशू प्राणाम सोनेकर (२१) (दोघेही रा. कस्तुरबा गांधी वॉर्ड, भंडारा) यांनी पोलिसांशी उद्धटपणे बोलायला सुरुवात केली. “मी पोलीसवाले खूप पाहिले आहेत, मी जेलमध्ये जाऊन आलो आहे, तू काय कारवाई करणार?” असे म्हणत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी आरोपी मयुर मनीष मोगरे (२२) हा त्याच्या बुलेटवरून (क्र. एम.एच. ३६ ए.एन. ८२७६) तेथे पोहोचला. या तिघांनीही संगनमत करून फिर्यादी कळमकर यांच्या अंगावर धावून जात त्यांना धमकावले. “तू इथून पळ, या पोलिसांना मी बघतो,” असे म्हणत त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
या प्रकरणी सुधीर कळमकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आणि ब्रीथ ॲनालायझरच्या रिपोर्टवरून भंडारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आरोपींविरुद्ध कलम २२१, १३२, ३५२, ३५१(२), ३(५) आणि सहकलम १८५ (मोटार वाहन कायदा) अन्वये गुन्हा (अ.क्र. ७२०/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास साहाय्यक फौजदार कुथे करत आहेत.








