spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महावितरणचा ‘मार्च एंड’ अ‍ॅक्शन प्लॅन: थकबाकी ‘शून्य’ करण्याचे संचालक राजेंद्र पवार यांचे स्पष्ट निर्देश

नागपूर :- आर्थिक वर्षाच्या अखेरीस महावितरणने महसूल वाढीसाठी कंबर कसली असून, नागपूर परिमंडळातील थकबाकीचे प्रमाण ‘शून्य’ करण्यावर भर दिला आहे. घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा सर्वच श्रेणींतील ग्राहकांकडील जुन्या व चालू थकबाकीची वसुली येत्या 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. शुक्रवारी नागपूर येथील ‘विद्युत भवन’ कार्यालयात आयोजित परिमंडळाच्या विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत नागपूर शहर आणि ग्रामीण मंडळाच्या विभागनिहाय कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, “महावितरण आपल्या ग्राहकांना अधिक सक्षम, अखंडित आणि दर्जेदार वीज सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, ही सेवा अधिक प्रभावी आणि दर्जेदार ठेवण्यासाठी वेळेवर महसूल मिळणे ही काळाची गरज आहे.” केवळ खाजगी ग्राहकच नव्हे, तर नगरपालिका आणि नगर परिषदांकडे प्रलंबित असलेल्या वीज देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबवून ती पूर्णतः वसूल करण्याचे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, प्रादेशिक कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

बुटीबोरी विभागात ‘ग्राऊंड झिरो’वर संवाद: संचालक राजेंद्र पवार यांनी बुटीबोरी विभागीय कार्यालयाला भेट देऊन महसूल वसुलीचा आढावा घेतला आणि विभागीय कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना महसूल वसुलीच्या कामासाठी मार्गदर्शन केले. तसेच बुटीबोरी उपविभागीय अधिकारी प्रशांत चरपे, शाखा अभियंता कुंभारे व श्रीपाद काळे आणि येथील जनमित्र यांच्यासोबत संवाद साधून वसुलीचा सविस्तर आढावा घेतला आणि दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. या प्रसंगी मुख्य अभियंता दिलीप दोडके व अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता स्वप्नील गोतमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

क्षेत्रिय कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधताना पवार म्हणाले की, “मार्च महिन्याचे उर्वरित 10 दिवस अत्यंत कळीचे आहेत. या काळात जास्तीत जास्त ग्राहकांशी संपर्क साधून थकबाकी शून्यावर आणावी.”

‘नागभवन’ उपकेंद्राचा गौरव आणि पाहणी: राजेंद्र पवार यांनी 33/11 केव्ही ‘नागभवन’ उपकेंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या उपकेंद्राने नुकतेच मानाचे ‘आयएसओ-9001:२2015’ प्रमाणपत्र प्राप्त केल्याबद्दल त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या भेटीदरम्यान मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे, कार्यकारी अभियंता धम्मदीप फुलझेले आणि अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन उज्जैनकर उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन उपविभाग कार्यालयाला भेट देऊन वीज देयकांच्या वसुलीचा आढावा घेताना कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला.

Popular Articles