spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सोलर पंप योजनेतील तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे कंपन्यांना  निर्देश – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई :- जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोलर पॅनल नुकसान झाल्याच्या प्रकरणी  कंपन्यांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत दिली.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात १८ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोलर पॅनलचे मोठे नुकसान झाले. पंचनामा व क्लेम दाखल होऊनही संबंधित कंपन्यांकडून भरपाई देण्यास टाळाटाळ होत असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. याप्रकरणी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून नुकसानभरपाई देणे व दोषी कंपन्यांवर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य संतोष दानवे यांनी मांडली.

राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री सौर पंप योजना राज्यात अत्यंत लोकप्रिय ठरली असून देशातील १३ लाख सोलर पंपांपैकी सुमारे साडे आठ लाख पंप महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. तक्रारीतील प्रकरणात नैसर्गिक आपत्तीमुळे पॅनल तुटल्यास सात दिवसांत बदल करणे बंधनकारक असून संबंधित कंपन्यांकडुन झालेल्या दिरंगाईची दखल घेण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांत कंपन्यांचे सेवा केंद्र कार्यरत असून स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत. मागील वर्षभरात प्राप्त २,३६९ तक्रारींपैकी २,१४६ निकाली काढण्यात आल्या असून २२३ तक्रारी प्रलंबित आहेत. संबंधित मतदारसंघात ४१ तक्रारींपैकी ३२ निकाली निघाल्या असून नऊ तक्रारी प्रलंबित आहेत. संबंधित शेतकऱ्यांचे सोलर पंप दुरुस्त, बदली करण्यात आले असून त्यांची तक्रारही निकाली निघाली आहे, अशी माहिती राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी दिली.

१२० दिवसांत पंप बसविणे बंधनकारक असून विलंब करणाऱ्या कंपन्यांवर  कारवाई केली जाते. जालना जिल्ह्यात ६७,७०६ शेतकऱ्यांनी पैसे भरले असून ४१,६२७ पंप बसविण्यात आले आहेत. उर्वरित प्रलंबित कामे पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी नमूद केले.

Popular Articles