spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पिवळी आणि नाग नदी संगम स्थळाची मनपा आयुक्तांकडून पाहणी

– ३० एप्रिलपर्यंत सफाईचे कार्य पूर्ण करण्याचे दिले निर्देश

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात सध्या नदी नाले सफाई अभियान प्रगतीपथावर राबविण्यात येत आहे. या अभियानाचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मंगळवारी (ता. 24) पावनगाव येथील पिवळी नदी आणि नाग नदी संगम स्थळाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नदी संगम परिसरातील जलपात्रात तातडीने साफसफाई करण्याचे तसेच नदी नाले सफाई अभियानाचे संपूर्ण कार्य येत्या ३० एप्रिलपर्यत पूर्ण निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

पाहणीदरम्यान मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार, सहायक आयुक्त विजय थूल, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, उज्वल धनविजय, तहसीलदार संतोष खंडारे, एनएमआरडीएचे चिमणकर आणि भूमी अभिलेखचे उपअधीक्षक विनोद मेरखेडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र), एन.एम.आर.डी.ए. आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना नदी सफाईच्या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना केल्या. पिवळी आणि नाग नदीच्या संगमापुढील भागाची स्वच्छता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करावी, असे आदेश त्यांनी एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांना दिले.

यासोबतच शहर आणि ग्रामीण तहसीलदारांनी संयुक्तपणे संगम पॉइंटवरील जमिनीची मोजणी करून नदीचा नैसर्गिक मार्ग मोकळा करावा, असे निर्देशही मनपा आयुक्तांनी दिले. तसेच पावनगाव येथे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे अर्धवट राहिलेले दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना ही डॉ. विपीन यांनी एन.एम.आर.डी.ए.च्या अधिकाऱ्यांना केल्या.

  गिट्टीखदान येथील नाल्याच्या भिंतीच्या कामाची पाहणी

मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या कृष्णनगर, आझाद नगर, गवळीपुरा, गिट्टीखदान या परिसरातील नाल्याच्या सुरक्षा भिंतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी परिसरातील नाला सुरक्षा संदर्भात नाविन्यपूर्ण पद्धतीने नाला भिंत बांधकाम कसे करता येईल, याची शहानिशा करण्यासंदर्भात सूचना केल्या तसेच नाल्यावरील अतिक्रमण काढण्याचे सुद्धा निर्देश सहायक आयुक्त यांना दिले. यावेळी मुख्य अभियंता श्री.मनोज तालेवार, नगरसेवक अभिजीत झा, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles