– कार्यालयात काच आणि सिरॅमिकचा वापर सुरू करून दिला प्लास्टिकमुक्त जीवनाचा मंत्र
नागपूर :- बदलत्या जीवन शैलीमुळे आरोग्यावर परिणाम होतांना दिसून येत आहे. अशात कर्करोग, विशेषतः स्तन, गर्भाशय, फुफ्फुस आणि मुखाचा कर्करोग, डोके वर काढू लागला आहे. अशा परिस्थितीत केवळ भीती न बाळगता जनजागृतीतून प्रत्यक्ष कृतीकडे वळणे काळाची गरज आहे. हीच गरज ओळखून ‘ऑरेंज सिटी वॉटर’ ने कर्करोग मुक्तीसाठीच्या ‘एक कप बदलाव’ उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदविला आहे. ओसीडब्ल्यूने आपल्या कार्यालयात प्लास्टिकच्या कपच्या एवजी काच आणि सिरॅमिकचा वापर सुरू करून दिला प्लास्टिकमुक्त जीवनाचा मंत्र दिला आहे.
‘माय एफएम ९४.३ आणि ‘नागपूर महानगरपालिका’ यांच्या सहकार्याने ‘एक कप बदलाव’ या उपक्रमांतर्गत ओसीडब्ल्यूच्या कर्मचाऱ्यांसाठी एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रात मॅक्स हॉस्पिटलच्या डॉ. मुग्धा जुंघारी आणि आरजे आमोद यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. डॉ. मुग्धा यांनी कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि नियमित तपासणी करणे किती महत्त्वाचे आहे, यावर प्रकाश टाकला. विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनात नकळतपणे वापरले जाणारे ‘सिंगल युज प्लास्टिक’ आरोग्यासाठी कसे घातक ठरू शकते आणि त्यातून कर्करोगाचा धोका कसा वाढतो, याबद्दल त्यांनी शास्त्रीय माहिती दिली.
‘ऑरेंज सिटी वॉटर’ने केवळ जनजागृतीवर भर न देता, ती प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे. ओसीडब्ल्यूने आपल्या सर्व कार्यालयांमधून सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळला आहे त्याऐवजी काचेच्या आणि सिरॅमिकच्या भांड्यांचा वापर सुरू करून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याची सामूहिक शपथ घेतली. उपस्थितांनी देखील उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.








