मुंबई :- राज्यात वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने जनजागृती आणि कडक कारवाई या दुहेरी धोरणावर भर दिला आहे. नागरिकांना सतर्क करण्यासाठी विविध माध्यमांतून व्यापक मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले, राज्यात 2025 मध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर येथे बनावट ई-चलन लिंकद्वारे फसवणुकीचे 40 गुन्हे दाखल झाले असून 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच संशयास्पद लिंक व एपीके फाईल्सद्वारे फसवणुकीचे 193 गुन्हे नोंद असून 36 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी महापे (नवी मुंबई) येथे सायबर सुरक्षा प्रकल्पाचे मुख्यालय कार्यरत असून, राज्यभर 50 जिल्हा सायबर लॅब्स सुरू करण्यात आल्या आहेत. तांत्रिक तपासासाठी पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे.
जनतेमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी www.cybercrime.gov.in ही वेबसाईट आणि 1930 हेल्पलाइनचा प्रचार सोशल मीडियाद्वारे तसेच रेल्वे स्थानकांवरील एलईडी स्क्रीनद्वारे करण्यात येत आहे. परिवहन विभागाकडूनही बनावट वेबसाईट्स व ई-चलन लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रणासाठी महाआयटी आणि सायबर विभागाच्या समन्वयातून, माहिती-तंत्रज्ञान मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यावेळी सांगितले.








