– स्वच्छते संदर्भात जनजागृती करिता पुढाकार घ्यावा
– महापौर निता ठाकरे यांचे स्वयंसेवी संस्थांना आवाहन
नागपूर :- नागनदी स्वच्छता अभियानाअंतर्गत नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या अभियानात स्वयंसेवी संस्थांनी सामाजिक जाणीवेतून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केले.
नागनदी स्वच्छता अभियाना अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे व जागरूकता निर्माण करण्यासाठी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज (ता. 25) डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी महापौर ठाकरे होत्या. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहाय्यक आयुक्त प्रमोद वानखेडे, राजकुमार मेश्राम यांच्यासह शहरातील सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंता, स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रॅन्ड अम्बेसिडर कौस्तुव चॅटर्जी, यांच्यासह शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे (एनजीओ) प्रतिनिधी वरुण मेतानी, लीना बुधे, कार्तिक साबू यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्य अभियंता मनोज तालेवार यांनी नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या स्वच्छतेच्या संदर्भात माहिती दिली. गेल्या 1 मार्चपासून शहरातील नदी स्वच्छतेच्या मोहिमेला सुरूवात झाली असून यासाठी 16 पोकलेन मशीन लावण्यात आले असून या तिन्ही नद्यांची स्वच्छता करण्यासाठी 11 टप्प्यांमध्ये ही मोहिम राबविली जात आहे.
महापौर निता ठाकरे यांनी अंबाझरी तलावातील दूषित पाण्याच्या संदर्भात वाडी नगरपंचायतच्या माध्यमातून मलनिःसारण प्रक्रिया केंद्र (एसटीपी)चे काम सुरू असल्याचे सांगितले. यातून 11 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया होणार आहे. यानंतर अंबाझरी तलावात थेट दूषित पाण्याचा प्रवाह बंद होईल, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे अमृत योजना टप्पा 2 व जायका प्रकल्पाअंतर्गत शहहरात एकूण 5 एसटीपीच्या बांधकाम सुरू आहे. परंतु हे सर्व होत असताना लोकांमध्ये जनजागृती करण्याची व आपले शहर स्वच्छ राखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मोठी मदत होणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांनी तसेच सोशल मिडीया इन्फ्ल्यंसर्सनी मदत करावी, असे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
एनजीओनी कृती कार्यक्रम द्यावा- शिवानी दाणी वखरे
यावेळी बोलताना स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी वखरे यांनी एनजीओच्या प्रतिनिधींनी एक कृती कार्यक्रमाचे सादरीकरण करावे, अशी सूचना केली. यानुसार काही दिवसांनी एनजीओतर्फे हे सादरीकरण महापौरांच्या समोर केले जाईल, यानंतर शहरात राबविण्यात येणार्या कार्यक्रमाचा आराखडा निश्चित करण्यात येईल, असेही दाणी यांनी सुचविले.
यावेळी एनजीओच्या विविध प्रतिनिधींनी शहरात स्वच्छता राखण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. या सर्व सूचनांची दखल मनपा प्रशासनातर्फे घेण्यात येईल. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी झोननिहाय जनजागृती करणे, झोपडपट्टीमध्ये कचरा संकलन करण्याची व्यवस्था अधिक मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचेही महापौरांनी यावेळी सांगितले.








