मराठ्यांचा इतिहास, त्यातही कोल्हापूर गादीची पाळेमुळे, शाहू छत्रपतींची कर्तबगारी आदी विषयांवर डॉ. जयसिंगराव पवार यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी झाली नाही…
छत्रपती शिवाजी महाराज यांचा कार्यकालखंड केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या इतिहासाचाच अत्यंत अभिमान बाळगावा असा. संपूर्ण देश, आणि मोठमोठ्या जहागिर्यांवर मालकी सांगणारे राणा-रजपूत मोगलांचे मांडलिक होण्यात धन्यता मानत असताना शहाजी भोसले यांचा कोवळ्या वयातला मुलगा उठतो आणि हिंदवी साम्राज्य स्थापनेचे स्वप्न पाहतो ही घटनाच केवळ अद्भुत. अलीकडे छत्रपतींच्या ‘हिंदवी’स ‘हिंदुत्ववादी’ मखरात कोंबण्याचे प्रयत्न जोमाने आणि सत्ताधीशांच्या आशीर्वादाने होत असताना हा इतिहास जसा होता तसा सांगणार्या काही मोजक्या अभ्यासकांत जयसिंगराव भाऊसाहेब पवार हे एक अग्रमानांकित नाव. या छत्रपतींच्या वंशावळीशी नाते सांगणार्या कोल्हापुरात आज त्यांचे वयपरत्वे निधन झाले. त्यांच्या निधनाने आपण नक्की काय गमावले याची जाणीव करून देणे या शोकात्म क्षणाचे कर्तव्य ठरते. विशेषत: सरकारी आशीर्वादाने अन्यांचे कर्तृत्व स्वत:च्या ध्वजात गुंडाळण्याचा उद्योग भरात आलेला असताना आणि फुटकळ प्राध्यापकी शाहिरांस इतिहासकार मानण्याचा प्रघात पडत असताना छत्रपती संभाजी-पश्चात इतिहास घडवणार्यांची कर्तृत्वगाथा सांगण्यात जयसिंगरावांनी आपले आयुष्य व्यतीत केले. अशी माणसे ‘अशा’ महाराष्ट्रात आताशा होत नाहीत.
छत्रपती शिवरायांस दोन मुलगे. थोरले छत्रपती संभाजी. सईबाई ही त्यांची आई. त्यांच्या पाठीवर सोयराबाईंपासून झालेले छत्रपती राजाराम. छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई यांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज (पहिले) आणि छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांचे सुपुत्र म्हणजे शिवाजी (दुसरे). या घराण्याच्या पुढील फाटाफुटीनंतर कोल्हापूरची गादी या दुसर्या शिवाजी महाराजांपासून सुरू झाली आणि पहिल्या शाहू महाराजांकडे सातारा शाखेचे प्रमुखपद गेले. इतिहासाचा हा संघर्षमय टप्पा हा जयसिंगरावांचा ध्यास आणि ध्येय होते. त्यातही छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांनी मराठा साम्राज्याच्या उत्तरकालात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिलेल्या लढ्याच्या दस्तावेजीकरणाचे श्रेय नि:संशय जयसिंगरावांचे. हे कार्य महत्त्वाचे अशासाठी की सर्वसामान्यांच्या मनात मराठ्यांचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी आणि काही प्रमाणात राजाराम यांच्यापुरताच मर्यादित राहिला. राजाराम-ताराराणी यांची कारकीर्द १६८९ ते १७०७ या काळातील. याच काळात औरंगजेबाचाही अंत झाला. त्या समग्र काळाविषयी सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. त्या काळाचे तपशीलवार सादरीकरण हे जयसिंगरावांचे कर्तृत्व. मराठ्यांचा इतिहास, त्यातही कोल्हापूर गादीची पाळेमुळे, शाहू छत्रपतींची कर्तबगारी आदी विषयांवर डॉ. पवार यांच्याइतकी अधिकारी व्यक्ती दुसरी झाली नाही. त्यांच्या हातून या काळाची अधिकृत माहिती देणारे अनेक ग्रंथ लिहिले गेले. जयसिंगरावांची भाषा अनलंकृत. शिवाजी-कालीन इतिहास सांगायचा म्हणून ती कृत्रिम अलंकार पेहनत नाही. जयसिंगराव इतिहास सरळपणे सांगत. त्यांच्या महाराणी ताराबाईंवरील ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या भव्य ग्रंथाचे परीक्षण केले (लोकरंग- २१ सप्टेंबर २०२५). तो इतिहास सर्व आवश्यक तपशिलाने भरलेला असूनही वाचकास सदर ग्रंथ अत्यंत प्रवाहीपणे पुढे नेणारा आहे. या ग्रंथास पवार यांची विस्तृत अशी ४० पानी प्रस्तावना आहे. तीत ते विविध इतिहासकारांच्या त्या काळातील इतिहासाच्या आकलनावर भाष्य करतात. त्यातून त्यांची भूमिका आणि विचार परिप्रेक्ष्य समजून घेता येते.
जयसिंगरावांचा जन्म सांगली जिल्ह्यातलाच. ते गाव आणि तो काळ सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेला. त्यात वडील शिक्षणाचे महत्त्व जाणणारे. त्यांनी जयसिंगरावांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला धाडले. शाहू महाराजांनीच स्थापन केलेले ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग’ हे जयसिंगरावांचे त्या काळातील आश्रयस्थान. शिवाजी विद्यापीठात एम. ए. ला त्यांनी इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवल्यावर स्वत: विख्यात इतिहास संशोधक असलेले त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन साहाय्यक म्हणून निवड केली. वयाची जेमतेम विशी पार केलेल्या जयसिंगरावांनी त्या वेळी घेतलेला इतिहास अभ्यासाचा वसा शेवटपर्यंत टाकला नाही. पुढे २००१ पर्यंत डॉ. पवार यांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास शिकवला आणि अनेकांस घडवले. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली. मराठा सत्तेच्या उदयकाळापासून ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीपर्यंत ही पुस्तके आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे चरित्रही आहे. हे लेखन करताना ‘आज तो काळ राहिलेला नाही. तेव्हाचे प्रश्न आज नाहीत. पण राजकारण आणि त्यातील प्रवृत्ती तशाच असू शकतात’ याचे भान त्यांनी ठेवले. त्यामुळेच ‘शिवचरित्रापासून आम्ही काय शिकावे?’ हा लेख त्यांनी कारगिलचे युद्ध आणि गुजरातच्या दंगलीनंतर, २००२ च्या उत्तरार्धात लिहिला. त्या लेखाला आणखी सहासात लेखांची जोड देऊन त्याच नावाचे पुस्तकही नंतर आले.
‘शिवाजी कोण होता?’ या अनेक भाषांत उपलब्ध असलेल्या दीर्घलेखवजा पुस्तिकेचे लेखक कॉ. गोविंदराव पानसरे यांच्याशी वैचारिक मतभेद राखूनही जयसिंगरावांचे सख्य. कोल्हापूरमधील शाहू-विचारांची परंपरा जागती ठेवणार्या अनेक उपक्रमांत हे दोघे सहभागी असत. पोर्तुगीज कागदपत्रांचे मराठीत भाषांतर करणारे स. शं. देसाई हे तर शिवाजी विद्यापीठाच्या मराठा इतिहास संशोधन विभागातले त्यांचे सहकारीच. हे भाषांतर होण्यापूर्वी पोर्तुगीज भाषा शिकून शिवचरित्र अभ्यासणार्या गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या कामाबद्दलही जयसिंगरावांना आदर होता. छत्रपती संभाजी महाराजांना समजून घ्यायचे तर मेहेंदळे यांचे पुस्तकही वाचले पाहिजे, हे मत त्यांनी अनेकदा व्यक्त केले होते. मात्र आदल्या पिढीच्या इतिहासकारांकडून छत्रपती संभाजी महाराजांवर ‘अन्याय’ झाला काय आणि झाला तर त्याची कारणे काय, याचा वस्तुनिष्ठ धांडोळा घेणारेही जयसिंगरावच. हे काम करताना त्यांनी, त्यांना आदरणीय वाटणार्या इतिहासकारांनाही सोडले नाही. परीक्षण करायचे तर सगळ्यांचेच, हा वस्तुनिष्ठतेचा नियम त्यांनी पाळला. जयसिंगरावांचे मोठेपण असे की, तसे करूनही या इतिहासकारांविषयी आदर बाळगण्याची निराळी कारणे असू शकतात हेही त्यांनी जाणले आणि विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवले.
महाराष्ट्रात एकहाती इतिहास संशोधन करणार्यांची परंपरा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्यापासूनची आहे. या परंपरेत न बसता जयसिंगरावांनी संघटनकार्यही केले, संस्थांची उभारणी केली, हेही त्यांचे मोठेपण. इतिहासकार म्हणून ते व्यक्तिमत्त्वांचाच माग काढताना दिसतात हा आक्षेप खरा मानला तरी, त्यांचे लिखाण वाचल्यास व्यक्तींच्या वाटेने त्या काळाच्या अन्य खुणांची नोंदही त्यांनी घेतल्याचे स्पष्ट होते. व्यक्तिमाहात्म्याचे निरूपण न करता, मानवी मूल्यांचा जय कुठे आणि कधी होतो हे शोधणार्या या इतिहासकाराला आदरांजली.