spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा भीषण अपघात; थोडक्यात बचावले, घातपाताचा संशय?

– तिसऱ्यांदा अपघात; योगायोग की कट?

इनसाइडर न्युज टुडे,प्रतिनिधी भंडारा :- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी एका भीषण रस्ते अपघातातून थोडक्यात बचावले. नागपूरजवळील हल्दीराम शोरूमसमोर त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून खासदार पडोळे सुखरूप आहेत. मात्र, एकाच मार्गावर वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे आता घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सविस्तर असे की, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडारा येथून नागपूर विमानतळाच्या दिशेने निघाले होते. तेथून ते दिल्लीला रवाना होणार होते. नागपूर गाठत असताना हल्दीराम परिसरात एका ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचे नुकसान झाले, परंतु ‘देवाची कृपा’ म्हणून डॉक्टर पडोळे यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

विशेष म्हणजे, याच मार्गावर खासदार पडोळे यांच्या वाहनाला अपघात होण्याची ही तिसरी वेळ आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, तिन्ही वेळेस ट्रकनेच त्यांच्या वाहनाला धडक दिली आहे. एकाच व्यक्तीच्या बाबतीत, एकाच मार्गावर आणि एकाच पद्धतीने वारंवार होणारे हे अपघात केवळ ‘योगायोग’ असू शकत नाहीत, अशी चर्चा आता समर्थकांमध्ये सुरू झाली आहे. यामागे एखादा मोठा घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आपले लाडके खासदार सुखरूप असल्याची माहिती मिळताच भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. “आमचे मोठे बंधू डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर ईश्वराची कृपा आहे, त्यामुळेच ते या संकटातून सुखरूप बाहेर पडले,” अशी भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली आहे.

या वारंवार घडणाऱ्या अपघातांची सखोल चौकशी व्हावी आणि यामागे काही काळेबेरे आहे का, याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Popular Articles