– “राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर द्या, काँग्रेसवर टीका करून पळ काढू नका!”
हंसराज, भंडारा :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या रास्त प्रश्नांवर भाजपने अकारण काँग्रेसवर राजकीय टीका करण्याऐवजी वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावीत. भाजप जिल्हाध्यक्ष हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखी उत्तरे का देत आहेत, असा सडेतोड सवाल भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रश्न राहुल गांधींचे, मग उत्तरे भाजपकडून का?
मुकुंद साखरकर म्हणाले की, “एसआयआर हा विषय थेट मतदार यादी आणि नागरिकांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारांशी जोडलेला आहे. या प्रक्रियेतील त्रुटींवर लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा काही गुन्हा नाही. राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत; तर त्याचे अधिकृत व स्पष्ट उत्तर निवडणूक आयोगाने द्यायला हवे. मात्र, आयोगाची ढाल बनून भाजप काँग्रेसवर राजकीय चिखलफेक का करत आहे?” असा सवाल त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने २६ सप्टेंबर रोजी घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत साखरकर म्हणाले की, “आयोगाने मतदारांच्या घरी बीएलओ पाठवणे, ईसीआयनेट प्रणालीचे पुनरावलोकन करणे आणि दावे-हरकतींची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवणे यांसारखे बदल केले. जर आधीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि बिनचूक होती, तर आयोगाला ऐनवेळी हे बदल का करावे लागले? यावरून राहुल गांधींनी मांडलेले आक्षेप किती रास्त होते, हेच सिद्ध होते.”
“आमचा विरोध कोणत्याही व्यक्तीला नसून मतदारांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे हीच काँग्रेसची मुख्य भूमिका आहे. मतदार यादी पुनरावलोकनाच्या नावाखाली एकाही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये आणि ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी. जिल्ह्यात प्रवक्ते पाठवून काँग्रेसवर राजकीय नॅरेटिव्ह सेट करण्यापेक्षा निवडणूक आयोगाने स्वतः समोर येऊन जनतेच्या शंकांचे निरसन करावे,” असे आव्हानही साखरकर यांनी दिले. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि मतदारांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष हा लढा रस्त्यावर आणि सनदशीर मार्गाने सातत्याने सुरूच ठेवेल, असा पुनरुच्चारही त्यांनी शेवटी केला.







