spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कत्तलीसाठी होणारी जनावरांची क्रूर वाहतूक करडी पोलिसांकडून उघडकीस; ११ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त!

– नाकाबंदीदरम्यान दोन बोलेरो पिकअपसह ६ बैलांची सुटका; कामठीच्या व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा करडी :- नायलॉनच्या आखूड दोरीने अत्यंत निर्दयपणे बांधून, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांवर करडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनांमधून ६ बैलांची सुटका करण्यात आली असून, वाहनांसह तब्बल ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध विविध कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मोहाडी तालुक्यातून दोन पिकअप वाहनांमध्ये जनावरे दाटीवाटीने कोंबून नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे कत्तलीसाठी नेली जात होती. या माहितीवरून करडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार वरकडे व त्यांच्या पथकाने तातडीने सापळा रचून नाकाबंदी केली. संशयित वाहने येताच पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, दोन्ही वाहनांमध्ये प्रत्येकी ३-३ बैल अशा एकूण ६ बैलांना अत्यंत क्रूरपणे कोंबल्याचे आणि त्यांना हालचालही करता येणार नाही अशा पद्धतीने नायलॉनच्या दोरीने बांधल्याचे विदारक दृश्य समोर आले.

या कारवाईत पोलिसांनी महिंद्रा बोलेरो पिकअप (गाडी क्र. MH-35-K-4486) चा चालक राहुल सहसराम बोंदरे (वय ३३ वर्षे, रा. रोहा, ता. मोहाडी, जि. भंडारा) आणि दुसरी महिंद्रा बोलेरो पिकअप (गाडी क्र. MH-36-AA-3156) चा चालक संदिप शिवाजी मोहतुरे (वय ४० वर्षे, रा. निलज खुर्द, ता. मोहाडी, जि. भंडारा) यांना वाहनांसह ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ही जनावरे कामठी येथील सोनू कुरेशी (रा. कामठी, जि. नागपूर) याच्या सांगण्यावरून कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ०६ नग बैल आणि प्रत्येकी ५ लाख रुपये किमतीच्या दोन बोलेरो पिकअप गाड्या (एकूण किंमत १० लाख) असा मिळून एकूण ११ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.

या प्रकरणी करडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप. क्र. २६६/२०२६ अन्वये प्राणी क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक कायदा कलम ११(१)(ड), प्राणी संरक्षण कायदा कलम ९ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर धडक कामगिरी भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागलोत यांच्या नेतृत्वात पो.हवा. वरकडे यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करडी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

Popular Articles