spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अभियांत्रिकीत प्रवेशासाठी बोगस ‘एसटी’ प्रमाणपत्राचा वापर

नागपूर :- शासकीय नोकरीसाठी अनेकांना बोगस जात प्रमाणपत्र तयार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. आता अनुसूचित जमातीचे बोगस जात वैधता प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे.

व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेशासाठी अनुसूचित जमातीच्या (एसटी) बोगस वैधता प्रमाणपत्राचा वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हुडकेश्वर रोड येथील गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक मोहन करंभे, शुभम खोरगडे, अमोल घोडे व तीन विद्यार्थ्यांसह ११ जणांविरोधात पाचगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेत. अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तयार करणारी मोठी टोळी असल्याचे दिसते.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीनही विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. नागपुरात हा प्रकार उघडकीस आला असला तरी राज्यभर हा प्रकार होत असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकारामुळे अनुसूचित जमातीचे अनेक पात्र विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून मुकणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी सेल मार्फत शेकडो विद्यार्थ्यांनी अर्ज केला. यात अनुसूचित जमातीच्या ५० वर विद्यार्थ्यांनी अर्ज केले. संबंधितांचे जात वैधता प्रमाणपत्र तपासणीसाठी नागपूरच्या कार्यालयात पाठवण्यात आले. दरम्यान, दोन विद्यार्थ्यांचे वडील वैधता प्रमाणपत्राच्या चौकशीसाठी नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्त कार्यालयात आले. संबंधित अर्जावर कार्यवाहीच झाली नसताना त्याचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणीत पुन्हा तसाच एक प्रकार समोर आला. यातील दोन मुलींनी वंजारी महाविद्यालयात प्रवेश घेतला असून एक विद्यार्थी पुणे येथील महाविद्यालयात प्रवेशित आहे.

त्यामुळे मुला, मुलींच्या पालकांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर वंजारी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक मोहन करंभे, शुभम खोरगडे व अमोल घोडेंचे बयाण नोंदवण्यात आले. यात त्यांनी नंदू दुधपचारे (रा. उमरेड) व गणेश शेंडे (कुरखेडा, जि. गडचिरोली) यांची मदत घेतल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चौकशीत राहुल यादव व विवेक सिंग (दोन्ही नागपूर) यांचेही नाव समोर आले. या प्रमाणपत्रासाठी दोन लाखापर्यंतची रक्कम घेण्यात आल्याचेही समोर आले. यामुळे आदिवासी विकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सह आयुक्त अमिता पिल्लेवार-चव्हाण, उपसंचालक नीरजे मोरे, वरिष्ठ संशोधन अधिकारी नयन कांबळे यांच्या समितीने केलेल्या चौकशीत हा प्रकार समोल आला. पोलीस दक्षता प्रथकाच्या प्रमुख गोपिका कोडापे यांच्या तक्रारीवरून पाचगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आदिवासी विभागाचे सचिव व टार्टीचे संचालकही लक्ष ठेवून आहे. राज्यभरातील प्रमाणपत्रांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Popular Articles