स्वच्छतादूत कल्याणकारी दिन साजरा
नागपूर, ता. २३ : राज्य सफाई कामगार आयोग, नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने शासन आपल्या दारी या अंतर्गत ‘स्वच्छतादूत कल्याणकारी दिन’ मंगळवारी (ता. २२) पाटीदार भवनात साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाड-पागे समितीच्या शिफारसीनुसार १६९ वारसदारांना वारसा नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर होते. यावेळी आमदार मोहन मते, आमदार संदीप जोशी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर, प्रसाद कुलकर्णी, उपायुक्त राजेश भगत, सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर, माजी नगरसेवक मुन्ना यादव, माजी नगरसेवक संजय बंगाले, माजी नगरसेवक रमेश सिंगारे उपस्थित होते.
राज्यातील सर्व सफाई कामगारांना राज्य सरकारच्या विकास योजनांचा लाभ मिळावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबविणार असल्याची घोषणा राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केली.
सफाई कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या राज्य सरकार व नागपूर महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती या भव्य शिबीरात सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आली. तसेच आरोग्याची निःशुल्क तपासणी करण्यात आली. राज्य सरकार व महानगरपालिकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जवळपास ३६ स्टॉल लावण्यात आले होते. या योजनांची माहिती सफाई कर्मचाऱ्यांनी घेतली. तसेच या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सुद्धा केली. रमाई घरकुल योजनांच्या लाभार्थींना घरकुलांचे वाटप करण्यात आले. स्वनिधी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेशचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले. सफाई कामगारांच्या अपत्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण यावेळी करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सफाई कामगारांच्या समस्यांची पूर्ण जाणीव आहे. या जाणिवेतून त्यांनी सफाई कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शासन आपल्या दारी हा शासनाच्या योजना लाभार्थ्यांच्या घरापर्यंत नेण्याचा अभिनव उपक्रम आहे. नागपूर शहरात हा उपक्रम महानगरपालिकेच्या मदतीने यशस्वी झाला आहे. यासाठी मनपा आयुक्तांनी विशेष सहकार्य केले आहे.
हा कार्यक्रम यशस्वी झाल्यामुळे याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबविण्याच येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्याना राज्य सरकारच्या योजनांचा फायदा मिळणार आहे. सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणी सुद्धा शिबीर घेण्यात येत आहे. सफाई कामगारांच्या अपत्यांना चांगले शिक्षण मिळावे, त्यांच्या शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोग सातत्याने प्रयत्न करीत आहे. यासाठी राज्य प्रशासनाकडून चांगले सहकार्य मिळत असल्याचे शेरसिंग डागोरे यांनी सांगितले.
सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महानगरपालिका कटिबद्ध
यावेळी बोलताना आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सफाई कामगारांना अधिकाधिक सुविधा देण्याचे काम महापालिकेतर्फे करण्यात येत आहे. शासन आपल्या दारी ही संकल्पना यशस्वीपणे राबविली जात आहे. सफाई कामगारांना घरकुल उपलब्ध करून देणे तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अंमलबजावणी करण्यात महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना सफाई कामगारांच्या आरोग्याबद्दल तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे कामही नागपूर महापालिका करीत असल्याचे आयुक्त डॉ. चौधरी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार मोहन मते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे राज्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले. आतापर्यंत गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आता या जिल्हा सुद्धा विकासाच्या नव्या वाटा चालत असल्याचे आमदार मते यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी सफाई कर्मचारी रात्रंदिवस काम करीत असल्याचे सांगितले. महानगरपालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना २ गणवेश तसेच पावसापासून बचाव करण्यासाठी रेनकोट देण्यात आले आहेत. याशिवाय त्यांच्या सुविधांसाठी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही पंत यांनी सांगितले.
यावेळी शहरातील दहा झोनच्या सर्व झोनल अधिकाऱ्यांचा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यात ज्योती अरखेल, कविता अरखेल, प्रिती माटे, राजेश हाथीबेड, शैलेश बढेल, प्रवीण बोरकर, जयसिंग कुशवाह, प्रदीप माहतो आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त राजेश भगत यांनी केले.




