पदग्रहण समारंभात आ. परिणय फुके यांची ग्वाही
मुंबई २३ : गोवारी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाराष्ट्र शासनाने उचललेला महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून कैलाश राऊत यांची इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मुंबई अंतर्गत गोवारी समाज अंमलबजावणी व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतरचा पदग्रहण समारंभ सोमवारी नागपूरच्या दीक्षाभूमी मार्गातील श्रद्धानंद पेठ स्थित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात उत्साही वातावरणात पार पडला.
समारंभात माजी आदिवासी विकास राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार परिणय फुके यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गोवारी समाजाच्या दृष्टीने ही केवळ एक नियुक्ती नाही, तर सामाजिक न्यायाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. शासनाने या समाजासाठी दिलेल्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचवण्याची जबाबदारी आता एका अभ्यासू, संवेदनशील आणि कृतीशील नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे. ‘कैलाश राऊत’ यांच्या रूपाने समाजाला केवळ प्रतिनिधित्व नव्हे, तर संघर्षातून उभा राहणाऱ्या आत्मसन्मानाचा आवाज लाभला आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुळकर आणि सहायक संचालक धनराज सहारे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. परिणय फुके म्हणाले, गोवारी समाज अनेक दशकांपासून वंचित, दुर्लक्षित आणि प्रगतीपासून दूर राहिला आहे. शासनाच्या अनेक योजना अस्तित्वात असूनही त्या प्रत्यक्ष लाभदायक ठरत नव्हत्या, कारण त्या अंमलात आणण्यासाठी जे नेतृत्व आवश्यक होते, ते नव्हते. मात्र आता, कैलाश राऊत यांच्या रुपाने समाजाला विचारशील, झोकून देणारे आणि कृतीशील नेतृत्व लाभले आहे.
समाजाला फक्त आश्वासन नकोय, तर कृती हवी आहे. योजनांचे केवळ कागदोपत्री अस्तित्व पुरेसे नाही; त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजन, समन्वय आणि पारदर्शक अंमलबजावणीची नितांत आवश्यकता आहे. मला विश्वास आहे की कैलाश राऊत हे हे कार्य अतिशय सक्षमपणे पार पाडतील.
समाजासाठी कृती हीच खरी भाषा : कैलाश राऊत
आपल्या भाषणात कैलाश राऊत म्हणाले, ही नियुक्ती केवळ सन्मानाची नसून, समाजाच्या न्याय्य अपेक्षांची जबाबदारीही आहे. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ गोवारी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी स्वतः झोकून देईन. मी ही संधी केवळ ‘पद’ म्हणून न पाहता, समाजसेवेचे खंबीर माध्यम म्हणून स्वीकारतो. ते पुढे म्हणाले, गोवारी समाजाला आज सर्वाधिक गरज आहे शिक्षण, आर्थिक सबलीकरण आणि सामाजिक न्याय या तीन टप्प्यांवरील ठोस वाटचालीची. बैठकींमध्ये वेळ न घालवता कृती, परिणाम आणि समाजाभिमुख बदलच आमचा मूलमंत्र असेल. समाजाने आजवर अनेक वचने ऐकलीत; आता समाज कृती मागतोय आणि मी ती कृती दाखवून विश्वास संपादन करणार आहे. समारंभात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कैलाश राऊत यांचा सन्मान करण्यात आला. उपस्थितांचे उत्साही प्रतिसाद आणि शुभेच्छांच्या गजरात या समारंभाने गोवारी समाजाच्या नव्या युगाचा प्रारंभ केला.




