Thursday, April 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सलग दुसऱ्या दिवशी अकोला जगात उष्ण

– अक्षय तृतीयेपर्यंत उष्णतेची लाट कायम

नागपूर :- राज्यातील सर्वच जिल्ह्यात सूर्याची वक्रदृष्टी झाल्यामुळे कडाक्याचे उन्ह पडताना दिसत आहे. त्यातही विदर्भावर सूर्याची वक्रदृष्टी अधिकच असल्याने सलग तीन दिवसांपासून अकोला देशातील पहिल्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरत आहे. अकोलाशिवाय कर्नाटकातील कलबुर्गी येथेही ४४ अंश सेल्सिअस तापमान होते. एल्डोराडो या संकेतस्थळानुसार मंगळवारी ही दोन शहरे जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरे ठरली.

नागरिकांसमोर मोठे आव्हान

उन्हाचा तडाखा वाढत असताना सर्वच नागरिकांना हा दाह सोसवेना झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून सकाळ उजडल्यानंतर अवघ्या काही वेळातच घराबाहेर पाय ठेवणे कठीण होत आहे. या उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना शाळा, नोकरी आणि कामानिमित्त घराबाहेर पडणे हे आता आव्हान बनत चालले आहे. यातच आता हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. त्यामुळे अत्यावश्यक असलेली कामे करायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

‘या’ तारखांना ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’

१४ आणि १५ एप्रिलला आठ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. १५ एप्रिलला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर आ7 सांगली या जिल्ह्यात तापमान उच्चांक गाठण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ एप्रिलला अकोला, अमरावतीसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १७ एप्रिलला अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १८ एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच लातूर, धाराशिव, सांगली या जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने काय आवाहन केले

हवामान खात्याने नागरिकांना दुपारी १२ ते ४ बाहेर पडणे टाळले पाहिजे असे आवाहन केले आहे. तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाचे काम टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उन्हात शक्यतो वाहने चालवू नये. ज्वलनशील वस्तूंपासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच भरपूर पाणी पिण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

अक्षय तृतीयेपर्यंत उष्णतेची लाट कायम

विदर्भातही दुपारच्या वेळी उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याचा इशारा दिला आहे. यात १६ ते १९ एप्रिल अर्थात अक्षय तृतियेपर्यंत संपूर्ण विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com