Thursday, April 16, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुम्ही खाताय ते पनीर-चीज अस्सल आहे का?

– हॉटेलच्या मेन्यू कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय

अकोला :- बाहेर तुम्ही जे खातंय, ते खरे पनीर व चीज की ते ‘अनालॉग’ आहे? कमी किंमतीत पदार्थ देण्यासाठी ‘अनालॉग’चा मोठ्या प्रमाणात वापर होतो. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी त्याच्या वापरण्यावर आता निर्बंध लादले आहेत. मेन्यूत स्पष्ट माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

‘चीज अनालॉग’ वापराबाबत नवीन निर्देश

हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांसाठी अन्न सुरक्षा विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व नियम २०११ अंतर्गत ‘चीज अनालॉग’ वापराबाबत पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी २० मार्च रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, ज्या आस्थापनांमध्ये ‘चीज अनालॉग’ वापरून खाद्यपदार्थ तयार केले जातात, त्यांनी आपल्या मेन्यू कार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याचा स्पष्ट व ठळक उल्लेख करणे अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व संबंधित आस्थापनांनी ३० एप्रिल २०२६ पर्यंत आवश्यक बदल करणे बंधनकारक आहे.

पिझ्झा, बर्गर, सँडविचमध्ये वापर

“चीज अनालॉग” हे पारंपरिक दुग्धजन्य चीज नसून वनस्पती तेल, स्टार्च व इतर घटकांपासून तयार केलेले पर्यायी उत्पादन आहे. पिझ्झा, बर्गर, सँडविच यांसारख्या पदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. दिसायला व चवीला चीजसारखे असल्याने ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

या निर्णयामागे ग्राहकांची फसवणूक टाळणे आणि त्यांना अन्नपदार्थांविषयी अचूक माहिती मिळावी हा मुख्य उद्देश आहे. ग्राहकांनी पैसे देऊन घेतलेल्या पदार्थामध्ये नेमके काय वापरले आहे, हे जाणून घेणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

… तर दंड, परवाना निलंबन किंवा कायदेशीर कारवाई

परिपत्रकानुसार, १ मे २०२६ नंतर जर कोणत्याही आस्थापनामध्ये “चीज अनालॉग” वापराबाबत मेन्यूमध्ये स्पष्ट उल्लेख आढळला नाही, तर संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये दंड, परवाना निलंबन किंवा इतर कायदेशीर उपायांचा समावेश असू शकतो. अन्न सुरक्षा विभागाने सर्व फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओ) यांना तत्काळ आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले असून, ग्राहकांनीही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्न घेताना मेन्यूवरील माहिती काळजीपूर्वक वाचून खात्री करणे गरजेचे झाले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com