संदीप कांबळे,कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या गांधी नगर भागात आज सकाळी साडे सहा दरम्यान गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्याने आगीत होरपळून घरातील कर्ता व्यक्तीचा घरातच दुर्दैवी मृत्यू झाला तर घरातील मृतकाची पत्नी व दोन मुले सुदैवाने बचावले तसेच लोकवस्ती ही बचावली .या घटनास्थळा जवळील काही अंतरावर एच पी गॅस कंपनीची एक मोठे गॅस सिलेंडर गोदाम आहे तसेच रामगढ येथे सुद्धा एक मोठे सिलेंडर गॅस गोदाम आहे .हे दोन्ही गॅस सिलेंडर गोदाम लोकवस्तीत असून अनावधनाने गॅस गळती होऊन अश्याच प्रकारचा सिलेंडर स्फोट झाल्यास मोठ्या संख्येतील नागरिक मृत्यूच्या सापळयात येतील व मोठ्या जीवित हाणीचा सामना करावा लागेल त्यामुळे कामठी शहरातील लोकवस्तितील हे दोन्ही गॅस सिलेंडर गोदाम धोकादायक ठरत आहेत. तेव्हा संबधीत प्रशासनाने ही बाब गांभिर्याने लक्षात घेता दोन्ही सिलेंडर गोदाम शहराबाहेर लोकवस्तितून हटवावे अशी मागणी जोर धरत आहे.
गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारी वेगवेगळ्या कंपन्यांची तिवारी व कोठारी नामक दोन गॅस एजन्सी ची गोदामे शहराच्या आत असलेल्या भाजी मंडी तसेच रामगढ परिसरातील लोकवस्तीत आहेत. भरवस्तीत असणारी ही गोदामे धोकादायक असून ती शहराबाहेर हलविण्याच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची ओरड होत आहे
गॅस सिलिंडरच्या गोदामाला आग लागून मुंबई येथे मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची घटना दोन वर्षभरापूर्वी घडली. त्यानंतरही अशा स्वरूपाच्या अनेक घटना विविध शहरांमध्ये झाल्या. त्या पार्श्वभूमीवर भविष्यातील धोका लक्षात घेता कामठीतील गॅस सिलिंडरची गोदामे शहराबाहेर हलविण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. पूर्वी शहराची लोकसंख्या कमी होती. वस्त्या कमी असल्यामुळे कंपन्यांच्या गॅस सिलिंडरची गोदामे वस्त्यांपासून दूर होते. परंतु, कालौघात शहर विस्तारले आणि गॅस कंपन्यांची गोदामे दाट वस्त्यांनी वेढल्या गेली आहेत.
नियमाप्रमाणे गॅस सिलिंडरचे गोदाम हे शहराबाहेर आणि एकांतस्थळी असणे आवश्यक आहे. तसेच शहरातील आणि भरवस्तीत गॅस एजन्सीमध्ये नियमाप्रमाणे सहापेक्षा अधिक सिलिंडर ठेवता येत नाहीत. मात्र, या नियमाचे पालन होत नसल्याचे वास्तव आहे. गॅस एजन्सीच्या कार्यालयांमध्ये सिलिंडरचा साठा क्षमतेपेक्षा अधिक दिसून येतो. अशा ठिकाणी स्फोट होऊन अपघात होण्याचा धोका अधिक आहे. त्याकडे ऑइल कंपन्यांनी लक्ष द्यायला हवे, अशी मागणी जनमानसातून होत आहे.
कारवाई व्हायला हवी!
गॅस सिलिंडरचे गोदाम हे नियमाप्रमाणे शहराबाहेर वा एकांतस्थळी असणे आवश्यक असतानाही गॅस कंपन्यांचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मुख्य म्हणजे याबाबत पुरवठा विभागाचे अधिकारीदेखील पाठपुरावा करत नाहीत. त्यामुळे अधिकारी आणि गॅस कंपन्यांचे साटेलोटे तर नाही ना, अशी शंका बळावत आहे. तसे असल्यास त्यावर कारवाई व्हायला हवी, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.



