कामठीत गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

0
60

– गांधीनगर भागातील घटना

कामठी :- येथील गांधीनगर भागातील भाजी मंडी परिसरात आज रविवारी सकाळी साडे सहा वाजता   पानतावणे कुटुंबात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन एका ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील ८ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत घराचे आणि घरातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांधीनगर येथील विनय दशरथ पानतावणे यांच्या घरी आज दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास चहा बनवत असताना अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या भिंतींना तडे गेले आणि घराला आग लागली.

या दुर्दैवी घटनेत अतुल दशरथ पानतावणे (वय ४२ वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील इतर सदस्य किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विनय दशरथजी पानतावणे (वय ४६), नितीन दशरथजी पानतावणे (वय ५०), शारदा दशरथजी पानतावणे (वय ७२), नलिनी दशरथजी पानतावणे (वय ४८), नम्रता अतुल पानतावणे (वय ३७), अथर्व अतुल पानतावणे (वय १०), आदित्य अतुल पानतावणे (वय ६) आणि वेदांत पानतावणे (वय ५) यांचा समावेश आहे.

मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान

सिलिंडर स्फोटानंतर लागलेल्या आगीत घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, पाण्याच्या दोन मोटारी, सोफा, कपाट, महत्त्वाचे दस्तऐवज (आधार कार्ड, रेशन कार्ड), सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये जळून खाक झाले आहेत. तसेच घराचे बांधकाम आणि इलेक्ट्रिक फिटिंगचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक नियाज अहमद मुमताज अहमद व इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास प्रशासन करत आहे. एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर ओढवलेल्या या संकटामुळे कामठी परिसरात शोककळा पसरली आहे.