हंसराज,भंडारा :- भंडारा शहरातील मुख्य एस.टी. डेपो परिसरात आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एस.टी. बस रिव्हर्स घेत असताना बसच्या चाकाखाली आल्याने बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
रोहित खेडकर (वय ३५ वर्ष) आणि त्यांचा ३ वर्षांचा चिमुकला मुलगा रौनक खेडकर, अशी मृतांची नावे आहेत.
रोहित खेडकर हे शहरात आर.ओ. (RO) पाणी पुरवठ्याचा व्यवसाय करायचे. नेहमीप्रमाणे ते आपल्या दुचाकीने रिकाम्या कॅन गोळा करण्यासाठी एस.टी. डेपो परिसरात गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा ३ वर्षांचा मुलगा रौनक देखील होता. डेपोमध्ये एक एस.टी. बस चालक आपली गाडी रिव्हर्स (मागे) घेत असताना, बसचा अंदाज न आल्याने रोहित आणि त्यांचा मुलगा बसच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. हा अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण अपघाताची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि मोठी गर्दी घटनास्थळी जमा झाली. लाडक्या चिमुकल्यासह वडिलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. संतप्त नागरिकांनी डेपो परिसरात गर्दी केल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. भंडारा, जवाहरनगर, तुमसर, कारधा पोलिस ठाण्यांचे पोलिस निरीक्षक तसेच पोलिस मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला.
कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर रोहित खेडकर हे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पाणी विक्रीच्या व्यवसायातून करत होते. त्यांच्या आणि त्यांच्या लहान मुलाच्या मृत्यूमुळे खेडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भंडारा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत.

