कामठी :- येरखेडा नगर पंचायत अंतर्गत येणाऱ्या बागडोर नाल्यामुळे परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता, तेथे तातडीने सुरक्षा भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष राजकिरण बर्वे यांनी केली आहे. त्यांनी महामेट्रो प्रबंधकांना यासंदर्भात लेखी पत्र सादर केले आहे.
बागडोर नाल्याच्या किनारी मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. पावसाळ्यात नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची समस्या वारंवार उद्भवतात. ही सुरक्षा भिंत बांधल्यास केवळ जलभराव आणि भूक्षरण थांबणार नाही, तर स्थानिक रहिवाशांना सुरक्षित वातावरणही लाभणार आहे.
याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष राजकिरण बर्वे म्हणाले की, “क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. महामेट्रो प्रशासनाने या विषयावर सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर काम सुरू करावे, अशी आमची अपेक्षा आहे.” जनहितासाठी अशा प्रकारचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

