spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शासकीय कामे वेळेत करा ..! – राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक

Ø पुसद तालुक्यातील विकासकामांचा घेतला आढावा

यवतमाळ :- पुसद तालुक्यातील विविध विभागांच्या कामांचा राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी पुसद येथे सोमवारी सविस्तर आढावा घेतला.

वन विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, उपवनसंरक्षक श्री स्वामी, तहसीलदार रेखा वाणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पुसद तालुक्यातील आठ जिल्हा परिषद सर्कलचे पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत शासकीय कामे वेळेत आणि जबाबदारीने पूर्ण करणे आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा महत्वाचा ठरला. रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करावीत तसेच दुरुस्तीची प्रलंबित कामे विलंब न लावता पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” अभियान (टप्पा क्र. १) प्रभावीपणे राबविणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीचा आढावा, मान्सूनपूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापन, एसआय आर कार्यक्रम, जनगणना कार्यक्रमाची तयारी, अवैध सावकारी प्रकरणांवर नियंत्रण, पीक कर्ज वाटप आणि खरीप हंगामपूर्व नियोजन या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

सर्व विभागांनी समन्वय साधून कामे गतीने पूर्ण करण्यावर भर देत नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या सूचना राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी दिल्या. प्रशासन अधिक कार्यक्षम बनवून विकासकामांना गती देण्याला प्राधान्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Popular Articles