spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाड औद्योगिक वसाहतीत ८८ कोटींचा अमली पदार्थ साठा जप्त

 

महाड २४ : रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसीमधील एका बंद पडलेल्या रासायनिक कंपनीवर टाकलेल्या धाडीत पोलिसांनी तब्बल ८८ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. ३४ किलो किटामाईन पावडर आणि १३ किलो लिक्विड किटामाईन असा हा साठा असून, तो बंद कंपनीत गुप्तपणे तयार केला जात होता.

महाड औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांपासून ही बेकायदेशीर रसायन प्रक्रिया सुरू होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महाड एमआयडीसी पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

प्राथमिक तपासानुसार, कंपनीत कायदेशीर उत्पादनाऐवजी अमली पदार्थांची निर्मिती केली जात होती. हे पदार्थ मुंबईसह इतर महानगरांमध्ये वितरणासाठी पाठवले जात होते. या बेकायदेशीर व्यवहारात संघटित टोळी तसेच काही लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा पोलिसांचा संशय आहे. काही संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास सुरू आहे.

या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहे.

‘झिरो टॉलरन्स’ धोरणाची अंमलबजावणी
रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्करीविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याची घोषणा केली होती. मुरूड आणि अलिबाग परिसरात याआधी एका टोळीचा छडा लावण्यात आला होता. या पृष्ठभूमीवर महाडमधील ही कारवाई ही दुसरी मोठी मोहीम मानली जात आहे.

रायगड पोलीस विभागाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “अमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात”, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Popular Articles