spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बुद्ध जयंती निमित्त जागतिक शांततेसाठी ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे निघणार “युद्ध नाही बुद्ध पाहिजे” शांतीमार्च

– “विद्युत रोषणाईने उजळले ड्रॅगन पॅलेस; पंचशील ध्वजांच्या तेजाने परिसर झाला धम्ममय

– विशेष बुद्ध वंदना आणि धम्म देसनाचे सुद्धा आयोजन

कामठी :- आज संपूर्ण जग संघर्षाच्या उंबरठ्यावर असताना, मानवजातीला केवळ तथागत गौतम बुद्धांचे विचारच तारू शकतात. बुद्ध जयंती निमित्त याच उदात्त विचारांचा जागर करण्यासाठी आणि ‘युद्ध नाही बुद्ध पाहिजे’ हा शांततेचा मंत्र जनमानसात रुजवण्यासाठी, विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे वैशाख बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

१ मे आणि २ मे २०२६ रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवासाठी संपूर्ण परिसराचे स्वरूप पालटले असून, परिसर भक्तिभावाने ओसंडून वाहत आहे.

नयनरम्य विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटी

बुद्ध जयंतीच्या पावन पर्वावर ड्रॅगन पॅलेस टेम्पलला नवरीप्रमाणे सजवण्यात आले आहे. संपूर्ण ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसराची विशेष रंगरंगोटी करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी हा परिसर डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. मुख्य मार्गावर ठिकठिकाणी फडकणारे निळे-धवल ‘पंचशील ध्वज’ धम्माच्या विजयाची साक्ष देत आहेत. हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची आतापासूनच गर्दी होत आहे.

शांती मार्च आणि धम्मदेसना 

१ मे: भव्य शांती मार्च

शुक्रवारी सकाळी ८:०० वाजता पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत सामूहिक बुद्ध वंदना आणि ‘धम्मदेसना’ पार पडेल. त्यानंतर सकाळी ९:०० वाजता ड्रॅगन पॅलेस टेम्पलपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्रापर्यंत ऐतिहासिक शांती मार्च काढला जाईल. अहिंसा, करुणा आणि समतेचा संदेश देणारा हा मार्च या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरेल.

२ मे: एक दिवसीय ध्यान शिबीर

मानसिक शांततेसाठी शनिवार, २ मे रोजी सकाळी ९:३० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत ‘एक दिवसीय ध्यान शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटर येथे साधकांना चित्तशुद्धीची साधना करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या महोत्सवाचे यशस्वी नियोजन ओगावा सोसायटी, ड्रॅगन पॅलेस टेम्पल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्र, हरदास शैक्षणिक संस्था आणि दादासाहेब कुंभारे प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.