– आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमातून संत विचारांचा प्रसार
हंसराज भंडारा :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यभर विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या मालिकेत भंडारा येथे “ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला” हा विशेष आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम शुक्रवार, दि. ०८ मे २०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता पोलीस बहुउद्देशीय हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागे, त्रिमूर्ती चौक, भंडारा येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला असून, जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, वारकरी बांधव व संत साहित्य अभ्यासक यांच्यात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
संत ज्ञानेश्वर माऊली हे महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील एक तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांनी ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाद्वारे भगवद्गीतेचे सोप्या मराठीत भाषांतर करून अध्यात्म, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या कार्यामुळे समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि भेदभाव दूर होण्यास मदत झाली. वारकरी संप्रदायाला त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून, त्यांच्या विचारांचा प्रभाव आजच्या आधुनिक समाजातही तितकाच महत्त्वाचा आहे.
या जयंती वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमांद्वारे नव्या पिढीला संत ज्ञानेश्वरांच्या विचारांची ओळख करून देणे, तसेच समाजात सकारात्मक मूल्यांची जपणूक करणे हा प्रमुख उद्देश आहे. “मोगरा फुलला” या संकल्पनेतून ज्ञान, भक्ती आणि संस्कृतीचा सुगंध समाजभर दरवळावा, असा संदेश देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रख्यात प्रबोधनकार गणेश शिंदे यांचे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या व्याख्यानातून ज्ञानेश्वरांच्या अध्यात्मदृष्टिकोनाचा सखोल उलगडा, समाजप्रबोधनातील त्यांचे योगदान आणि आजच्या काळातील त्यांच्या विचारांची उपयुक्तता यावर प्रकाश टाकला जाणार आहे. याशिवाय कार्यक्रमात अभंग-भजन, कीर्तन तसेच संत साहित्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे होणार असून उपस्थितांना एक समृद्ध आध्यात्मिक अनुभव मिळणार आहे.
सदर कार्यक्रम आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान), महाराष्ट्र राज्य तसेच डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री- गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभाग तथा पालकमंत्री, भंडारा यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून, राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा गौरव व प्रसार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
भंडारा व परिसरातील नागरिक, वारकरी बांधव, विद्यार्थी आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.