spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्र दिनानिमित्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण

– उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

नवी मुंबई :- महाराष्ट्र दिनाच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त, कोकण विभागाचे मुख्य ध्वजारोहण कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या समारंभास नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रशस्त संचलनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना

समारंभात विविध पोलीस व आपत्कालीन सेवांच्या पथकांनी संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यामध्ये राज्य राखीव पोलीस दल क्र.11, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक, नवी मुंबई पोलीस, महिला पोलीस, वाहतूक शाखा, अग्निशमन दल, पोलीस बँड पथक, श्वान पथक, बुलेट प्रुफ व बीडीडीएस वाहने, फायर रेस्क्यू बाईक, निर्भया पथक, आणि रस्ता सुरक्षा अभियान पथक आदींचा समावेश होता. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हे संचलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.

उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव

पोलीस विभागाच्या विविध शाखांमधील पुढील पोलीस अधिकारी व कर्मचारी : पोलीस उपअधिक्षक रमेश पंढरीनाथ भामे, पोलीस निरीक्षक सुनिल दत्तात्रय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक रमेश आनंदा पाटील, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र रघुनाथ राऊत, पोलीस हवालदार संजय बाळाराम तांडेल, पोलीस हवालदार सचिन साहेबराव शेवाळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र उखा पवार, पोलीस हवालदार सचिन एकनाथ कडू , पोलीस नाईक अभय आत्माराम सांगळे तर सी सेवा पदक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरेश नागरे, पोलीस नाईक पृथ्वीराज अजितसिंग घोरपडे, या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकालावधीत त्यांनी केलेल्या विशेष कार्याबद्दल आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीसाठी अचूक व अद्यावत मतदार यादी असणे आवश्यक आहे यादृष्टीने राज्यात सध्या SIR (Special Intensive Revision) अर्थात मतदार यादीची विशेष सखोल पुनरावृत्ती मोहिम सुरु असून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या या मोहिमेचा शुभारंभ विभागीय आयुक्त अग्रवाल यांच्याहस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय आयुक्त कोकण विभाग सिध्दाराम सालीमठ, अपर आयुक्त (सामान्य) फरोग मुकादम, सह आयुक्त (नियोजन) प्रमोद केंभावी, सहआयुक्त (पुर्नवसन) रवि पाटील, सहआयुक्त (करमणूक व शुल्क) रविद्र पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील आणि निंबाजी गीते यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, सुसज्ज व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Popular Articles