– जिल्हाधिकारी विकास मीना यांची उपस्थिती
यवतमाळ :- जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ४ मे रोजी आयोजित ‘युवा संवाद’ सत्रात भारतीय वन सेवेतील अधिकारी एन. भुवनेश्वर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यूपीएससी परीक्षेत देशात ३१ व्या क्रमांकाने यश संपादन करणाऱ्या एन भुवनेश्वर यांनी आपला अनुभव मांडताना अभ्यासाच्या पारंपारिक पद्धतींसोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावहारिक अनुभवावर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी विकास मीना यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्पर्धा परीक्षेचा प्रवास संयमाचा असल्याचे सांगत सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्रातील मार्गदर्शनाचे प्रमुख पैलू:
निर्णयक्षमता आणि स्पष्टता
एन. भुवनेश्वर यांनी सांगितले की, पूर्व परीक्षेत सातत्याने चांगले गुण मिळत असूनही, दोन प्रयत्नांनंतर त्यांनी स्वतःच्या आवडीचा पुनर्विचार केला. आयएएसऐवजी आयएफएस निवडण्याचा त्यांचा निर्णय हा ‘सेल्फ-अवेअरनेस’ आणि ध्येयाप्रती असलेल्या स्पष्टतेचा परिणाम होता.![]()
केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहू नका
अभ्यासासाठी फक्त संदर्भ पुस्तके पुरेशी नाहीत. विद्यार्थ्यांनी YouTube सारख्या माध्यमांचा प्रभावी वापर करावा. विशेषतः उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) टूल्सची मदत घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण
भूगोल आणि इतिहासाचा अभ्यास केवळ वाचून न करता तो प्रत्यक्ष अनुभवणे गरजेचे आहे. “अजिंठा-वेरूळ सारख्या वारसा स्थळांना भेटी द्या. वर्धा किंवा पैनगंगा नदी प्रत्यक्ष पाहून ती कुठून उगम पावते, तिचा प्रवाह कसा आहे, असे प्रश्न स्वतःला विचारा,” असे त्यांनी सुचवले.
बॅकअप प्लॅनचे महत्त्व
यूपीएससी हा अत्यंत अनिश्चित प्रवास असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या करिअरमध्ये एक ‘बॅकअप प्लॅन’ तयार ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून मानसिक दडपण कमी होऊन अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करता येईल.
“स्पर्धा परीक्षेची तयारी ही केवळ वाचनाची प्रक्रिया नसून ती समज, अनुभव आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची कला आहे,” असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. या संवाद सत्रामुळे युवकांना स्पर्धा परीक्षेसाठी एक नवीन दृष्टिकोन आणि व्यावहारिक रणनीती मिळाली.