spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कोष्टी ही स्वतंत्र जात नव्हे तर व्यवसाय

– जातवैधता प्रमाणपत्र प्रकरणात उच्च न्यायालयाचे निरीक्षण

नागपूर :- काही कागदपत्रांमध्ये ‘कोष्टी’ असा उल्लेख आढळल्यामुळे ‘हलबा’ जमातीचा दावा नाकारता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदवले. ‘कोष्टी’ ही जात नसून विणकामाशी संबंधित व्यवसाय असल्याचे नमूद करत न्यायालयाने जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द केला आणि याचिकाकर्त्यांचा ‘हलबा’ अनुसूचित जमातीचा दावा वैध ठरवला. न्या. मुकुलिका जवळकर आणि न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

वाद काय होता?

महेंद्र मनोहरराव हेडाऊ (५२) व वर्षा सुधाकरराव हेडाऊ (विवाहानंतर वर्षा विलास धनोरकर, ४६) हे दोघे सहाय्यक शिक्षक असून त्यांच्या ‘हलबा’ जमातीच्या दाव्याला नागपूर येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीने नाकारले होते. काही नातेवाईकांच्या शालेय नोंदींमध्ये १९४३, १९४५ आणि १९५० या काळात ‘कोष्टी’ असा उल्लेख आढळतो, त्यामुळे त्यांची मूळ जात ‘हलबा’ नसून ‘कोष्टी’ असल्याचा निष्कर्ष समितीने काढला होता. दुसरीकडे, याचिकाकर्त्यांनी १९०४, १९०९ आणि १९१४ मधील स्वातंत्र्यपूर्व दस्तऐवज सादर करून त्यांच्या पूर्वजांची जात ‘हलबा/हलबी’ असल्याचे दाखवले. त्यांनी ‘कोष्टी’ हा उल्लेख जात नसून विणकामाशी संबंधित व्यवसायाचा असल्याचा युक्तिवाद केला. तसेच, पडताळणी समितीने या जुन्या व विश्वसनीय दस्तऐवजांकडे दुर्लक्ष करून आणि ‘ॲफिनिटी टेस्ट’चा अतिरेकी वापर करून चुकीचा निर्णय दिल्याचा आरोपही केला. जात पडताळणी समितीने २९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेला दावा अवैध ठरवण्याचा आदेश त्रुटीपूर्ण असल्याचे ठरवत न्यायालयाने तो रद्द केला आणि चार आठवड्यांत वैधता प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड.ए.एस.मार्डीकर यांनी तर राज्य शासनाच्यावतीने ॲड.एन.आर.पाटील यांनी बाजू मांडली.

न्यायालय काय म्हणाले?

प्रकरणात याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या १९०४, १९०९ आणि १९१४ मधील दस्तऐवजांना न्यायालयाने निर्णायक मानले. या स्वातंत्र्यपूर्व नोंदींमध्ये त्यांच्या पूर्वजांची जात ‘हलबा/हलबी’ असल्याचे स्पष्ट दिसते आणि त्या मूळ अभिलेखांवरून पडताळलेल्या असल्याने त्यांना अधिक पुरावात्मक मूल्य असल्याचे नमूद करण्यात आले. त्याउलट पडताळणी समितीने १९४३, १९४५ व १९५० मधील काही नोंदींतील ‘कोष्टी’ उल्लेखावर भर देत दावा फेटाळला होता. मात्र न्यायालयाने स्पष्ट केले की, त्या काळात विणकाम करणाऱ्यांना ‘कोष्टी’ असे संबोधले जात असे आणि तो व्यवसायाचा उल्लेख होता; १९९५ पूर्वी ‘कोष्टी’ ही स्वतंत्र जात म्हणून मान्यता नव्हती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.