नागपूर, दिनांक २५ : कापूस पिकावर जुलै महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यापासून आढळून येणाऱ्या तूडतुड्यांचा व याच महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारा फुलकीड्यांचा प्रादूर्भाव व गुलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भावापासून पिकाचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने एकीकृत व्यवस्थापनांतर्गत रस शोषक किडींचे व गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादूर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तूडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिला आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो, या सर्व प्रकारच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजनाचा अवलंब करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
एकात्मिक व्यवस्थापनांतर्गत कपाशीवरील रस शोषक कीडींचे व्यवस्थापनासाठी विशेषत: बीटी कपाशीला किटकनाशकांची फवारणी करू नये असा सल्ला देण्यात आला आहे. वेळोवेळी प्रादूर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण करण्यासाठी चवळीचे आंतर पीक घ्यावे. वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. तसेच मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन 25 टक्के प्रवाही 20 मि.ली., किंवा फिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांच्या वापराचा सल्ला देण्यात आला आहे. एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत असेही सांगण्यात आले आहे. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्यात. पीक उगवणी नंतर 35 ते 40 दिवसांपासून दर 15 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावाची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्व 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी केले आहे.








