spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुगल मॅपच्या नादात गणेशपूर ग्रामपंचायतीचे मुख्य गेट ला ट्रकने उडवले; शासनाच्या लाखांच्या निधीचे नुकसान

हंसराज,भंडारा :- बायपास रस्ता समजून चुकीच्या मार्गाने गावात शिरलेल्या एका भरधाव ट्रकने गणेशपूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ग्रामपंचायतीचे लोखंडी गेट पूर्णपणे कोलमडले असून, शासनाच्या निधीतून उभारलेल्या मालमत्तेचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी घडली असून, याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

धान भरलेला ट्रक (क्रमांक TS 08U J5454) घेऊन चालक निघाला होता. चालकाला रस्त्याची योग्य माहिती नसल्याने त्याने ‘गूगल मॅप’चा (Google Map) आधार घेतला. मात्र, गूगल मॅपने बायपास ऐवजी गावातील अरुंद रस्ता दाखवल्याने ट्रक थेट गावात शिरला. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ वळण घेत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट मुख्य गेटवर जाऊन धडकला. ही धडक इतकी भीषण होती की गेटचे सिमेंटचे खांब आणि लोखंडी सांगाडा निखळून पडला.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, नागरिकांमध्ये संताप सदर गेट हे शासनाच्या विकास निधीतून अत्यंत देखणे आणि मजबूत बनवण्यात आले होते. मात्र, एका चालकाच्या निष्काळजीपणामुळे लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. घटनेनंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त करत ट्रक मालकाकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य आणि अधिकारी यांनी तातडीने पोलिसात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

दिशादर्शक फलकाची गरज भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी बायपास आणि गावातील रस्त्यांच्या तोंडावर मोठे दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, तसेच अवजड वाहनांना गावात प्रवेश बंदी करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था उभी करावी, अशी मागणी गणेशपूरच्या नागरिकांनी केली आहे. संबंधित ट्रक मालक आणि कंपनीकडून पूर्ण नुकसान भरपाई वसूल केल्याशिवाय ट्रक सोडू नये, असा पवित्रा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.