– पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजनाचा आढावा
– जिल्ह्यात ६ लाख १६ हजार हेक्टरवर खरीपाचे नियोजन
– पीक विमासंदर्भात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे होणार बैठक
यवतमाळ :- जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरु झाली असून शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, निर्देश पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री ना. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे कच्छवे व विविध विभागाचे प्रमुख, सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्रीना. संजय राठोड पुढे म्हणाले, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्जाचे वाटप पूर्ण करावे. शेतकऱ्यांना दर्जेदार खत, बी-बियाणे, औषधी उपलब्धतेसाठी नियोजन करावे. जिल्ह्यात खत, बी-बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच खत, बी-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवावा. फळबाग व भाजीपाला लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. पशुधनासाठी वैरण विकासाचा धडक कार्यक्रम राबवावा. वीज पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा प्रचार प्रसार करावा, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी दिले.
फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा
शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी जिल्ह्यात फळबाग लागवडीविषयी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. जिल्ह्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढवावे. त्यासाठी शेतकऱ्यांना फळबाग लागवड योजनेचा लाभ द्यावा. फळवाग लागवडीसाठी रोपे तयार ठेवावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
जलयुक्त शिवार योजनेतील कामे पूर्ण करा
जलयुक्त शिवार योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात १४३१ कामे मंजूर आहेत. ही कामे जूनपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जलतारा प्रकल्पांतर्गत शेत शोषखड्ड्यांचे काम लवकरात लवकर सुरु करावेत, असे निर्देश पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी दिले.
पीक विमासंदर्भात मुख्यमंत्री व कृषिमंत्र्यांकडे होणार बैठक
जिल्ह्यातील पीक विमा नुकसान भरपाई वितरणातील अडचणींसंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्यासमवेत लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्री दत्ता भरणे यांना पुढील आठवड्यात भेटून त्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
या खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
जिल्ह्यात ६ लाख १६ हजार हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद, तीळ, मका या पिकांचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक ४ लाख ९६ हजार हेक्टरवर कापुस लागवड होणार असून त्यासाठी बीटी कापूस बियाण्यांचे २७ लाख ३३ हजार पाकीटांची आवश्यकता असून कंपन्याकडून ७० हजार पाकीटांचा पुरवठा झालेला आहे. त्यापाठोपाठ २ लाख २७ हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन असून त्यासाठी २ लाख ११ हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यात १४ हजार शेतकऱ्यांनी १ लाख ८० हजार क्विंटल घरचे बियाणे राखून ठेवलेले आहेत. तर १ लाख ८ हजार हेक्टरवर तुर लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.
तसेच युरिया, डिएपी, एमओपी, एसएसपी इ. रासायनिक खतांचा महिनानिहाय आवंटन व पुरवठा आराखडा तयार करण्यात आला असून २ लाख ७२ हजार मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी आहे. ६ मे पर्यंत १ लाख २९ हजार मे. टन साठा उपलब्ध असून १ लाख १७ हजार मे. टन खताचा साठी विक्रेत्यांकडे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सादरीकरणाद्वारे दिली.
भरारी पथक व नियंत्रण कक्ष
यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात गुणनियंत्रण भरारी पथके, नियंत्रण कक्ष व समित्या नेमल्या आहेत. यात ३६ गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हास्तरावर एक भरारी पथक, तालुका व पंचायत समितीस्तरावर ३२ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच कापूस तक्रार निवारण समिती, कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती, जैवतंत्रज्ञाण समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या बैठकीच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्राचे दिपक कच्छवे यांनी एल निनो, हवामान अंदाज आणि पर्जन्यमानविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन तांत्रिक अधिकारी व्यंकटेश कुंटावार यांनी केले.