हंसराज,भंडारा :- आजच्या आधुनिक युगात मुलांच्या विचारसरणीत मोठा बदल होताना दिसत आहे. पूर्वी लहानसहान गोष्टींचा ताण घेणारी मुले आता अनेक गोष्टींकडे सहजतेने पाहतात. मोबाईल, सोशल मीडिया, मित्रपरिवार आणि बदलती जीवनशैली यामुळे आजची पिढी “क्षणात जगणे” अधिक पसंत करत आहे.
मात्र दुसरीकडे पालकांची मानसिकता पूर्णपणे वेगळी दिसून येते. मुलांचे शिक्षण, करिअर, सुरक्षितता, भविष्यातील स्पर्धा, चुकीच्या सवयी आणि समाजातील वाढते दडपण यामुळे पालक सतत चिंतेत आणि तणावाखाली राहत आहेत. अनेक वेळा मुले शांत असतात, पण पालक त्यांच्या भविष्याचा अति विचार करून मानसिक ताण घेताना दिसतात.
विशेष म्हणजे मुलांपेक्षा पालकच “ओव्हरथिंक” करत असल्याचे चित्र अनेक कुटुंबांमध्ये दिसत आहे. संवादाचा अभाव, अपेक्षांचे वाढते ओझे आणि सोशल मीडियाचा प्रभाव यामुळे पालक आणि मुलांमधील दरी वाढत चालली आहे.
पूर्वीच्या काळातील पालक मुलांना त्यांच्या स्वभावानुसार आणि क्षमतेनुसार पुढे वाढण्याची संधी देत असत. जीवनातील छोट्या-मोठ्या अडचणींना सामोरे जाऊ देत असल्यामुळे मुले भावनिकदृष्ट्या अधिक मजबूत होत होती. अपयश, संघर्ष आणि अनुभवातून शिकण्याची मोकळीक त्यांना मिळत होती. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, संयम आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता निर्माण होत होती.
परंतु आजच्या काळात अनेक पालक अतिप्रोटेक्टिव्ह झालेले दिसतात. मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करणे, सतत काळजी करणे, इतर मुलांशी तुलना करणे आणि अवास्तव अपेक्षांचे ओझे टाकणे यामुळे मुलांवर मानसिक दबाव वाढताना दिसतो. “मुलांनी नेहमीच यशस्वी व्हावे” या विचारातून नकळत त्यांच्या भावनिक विकासावर परिणाम होत आहे. परिणामी मुलांमध्ये आत्मविश्वास कमी होणे, तणाव वाढणे आणि पालकांपासून भावनिक अंतर निर्माण होणे अशा समस्या वाढताना दिसत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, मुलांवर सतत दबाव टाकण्याऐवजी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि विश्वासाचे नाते निर्माण करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे मुलांनीही पालकांच्या चिंतेचा आदर करून त्यांच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.
आजच्या काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालक आणि मुलांमध्ये समतोल संवाद, विश्वास आणि भावनिक आधार हीच काळाची गरज बनली आहे.
काॅन्सेलर ऑड सायकोथेरेपीस्ट कल्याणी नंदेश्वर.