– पालकमंत्र्यांच्या हस्ते एसटी बसस्थानक व शासकीय रुग्णालयात सौर उर्जेवरील जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
यवतमाळ :- सामान्य नागरिक, एसटी प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा वार्षिक नावीण्यपूर्ण योजनेअंतर्गत एसटी बसस्थानक व वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सौर उर्जेवरील जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे आज पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण आभासी पद्धतीने करण्यात आले.
यवतमाळ बसस्थानक येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्ष ॲड. प्रियदर्शनी उईके, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आदी मान्यवर, नागरिक उपस्थित होते.![]()
पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी एसटी प्रवासी व रुग्णांसाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक व शाश्वत उपाय ठरणार असून विजेची बचत आणि खर्च कमी होणार असल्याचे सांगितले. तसेच स्वच्छ पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. एसटी प्रवासी व रुग्णालयातील नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करण्यासाठी नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेवून जिल्हा नियोजन अंतर्गत १५ कामांसाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या सुविधेचा योग्य वापर करावा. लोकहिताच्या प्रकल्पांसाठी सहकार्याची भूमिका असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे पालकमंत्री ना. राठोड यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात ७ ठिकाणी सौर उर्जेवरील जलशुद्धीकरण संयंत्रांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामध्ये ४ एसटी बसस्थानक, १ एसटी कार्यशाळा व २ वैद्यकीय महाविद्यालयात हे संयंत्र उभारण्यात आले आहे. यात यवतमाळ, वणी, नेर, बाभूळगाव बसस्थानकांचा समावेश आहे. या सौर उर्जेद्वारे ५ किलो व्हॅट वीज निर्मिती होणार असून त्यावर जलशुद्धीकरण संयंत्र चालणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.