– आधुनिक क्रीडा सुविधांमुळे जिल्ह्यातून घडणार आंतरराष्ट्रीय खेळाडू – पालकमंत्री ना. संजय राठोड
यवतमाळ :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विकास धोरणांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील क्रीडा सुविधांना आधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध पायाभुत सुविधांची उभारणी करण्यात आली. पंचायत समिती समोरील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘ॲस्ट्रोटर्फ’ हॉकी मैदानाचे भूमिपूजन आणि नेहरू स्टेडियम येथील नव्याने उभारण्यात आलेल्या सिंथेटीक हँडबॉल मैदानाचे लोकार्पण गुरुवारी (दि. 7 मे) पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड होते. प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा सदस्य किसन वानखेडे, नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी उईके उपस्थित होत्या. तसेच जिल्हाधिकारी विकास मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते आणि आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे यांची विशेष उपस्थिती होती.![]()
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री ना.संजय राठोड म्हणाले की, जिल्हा किंवा तालुका स्तरावर खेळाडूंना कोणत्याही क्रीडा सुविधांची किंवा मैदानांची आवश्यकता असल्यास त्यांनी थेट माझ्याशी किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच यवतमाळ शहरातही दारव्हा येथील क्रीडा संकुलाच्या धर्तीवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त संकुल उभारण्याच्या सूचना त्यांनी नगराध्यक्षांना दिल्या.
उत्कृष्ट क्रीडांगण निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन केले.
ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान आणि सिंथेटीक हँडबॉल मैदानामुळे स्थानिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर सराव करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे भविष्यात यवतमाळ जिल्ह्यातून जागतिक स्तरावरील खेळाडू घडण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्हा क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी झाला. कार्यक्रमाला विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.