spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी जवळील खैरी शिवारात स्क्रॅप गोडाऊनला भीषण आग

– २५-३० वाहनांसह सुटे भाग खाक 

कामठी :- तालुक्यातील खैरी शिवारातील मौजा खैरी येथील एका स्क्रॅप गोडाऊनला आज, ७ मे २०२६ रोजी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोडाऊनमधील अंदाजे २५ ते ३० गाड्यांसह वाहनांचे सुटे भाग (स्पेयर पार्ट्स) आणि ऑफिसचे फर्निचर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

सकाळी ९:२० ला आगीचे तांडव

मिळालेल्या माहितीनुसार, खैरी-कवठा रोडवरील सर्व्हे क्र. १२९ मध्ये असलेल्या या स्क्रॅप गोडाऊनमध्ये सकाळी ९:२० च्या सुमारास अचानक आग लागली. हे गोडाऊन मोमीनपुरा, नागपूर येथील रहिवासी निजामुद्दीन गियासुद्दीन यांच्या मालकीचे असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, स्थानिक चौकशीत ती अज्ञात कारणास्तव लागल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे.

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

घटनेची माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. दुपारी १:०० वाजेच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे सांगण्यात आले.

नुकसानीचा प्राथमिक अंदाज

या आगीत गोडाऊनचे पत्र्याचे शेड पूर्णपणे कोसळले आहे. प्राथमिक पाहणीनुसार  अंदाजे २५ ते ३० चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे.

मोठ्या प्रमाणात वाहनांचे स्पेयर पार्ट्स जळून खाक झाले आहेत.

गोडाऊनमधील ऑफिसचे फर्निचर आणि इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे.

सदर घटनेचा पंचनामा महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आला असून, यामध्ये तलाठी (खैरी), अग्निशमन अधिकारी (कामठी) आणि इतर पंचांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Popular Articles