spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“भेल” कडून सीएसआर अंतर्गत औषधांचा साठा महापौरांना सुपूर्द

– नागपूर महानगरपालिकेला मधुमेह व रक्तदाबावरील औषधांची वैद्यकीय मदत

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) भेल च्या सीएसआर उपक्रमांतर्गत मधुमेह, रक्तदाब तसेच इतर असंसर्गजन्य आजारांवरील औषधांची वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. औषधांचा साठा महापौर निता ठाकरे यांना सुपूर्द करण्यात आला.

महापौर कार्यालयात आयोजित छोटेखानी समारंभात खासदार माया ईवनाते, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्ता पक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, वैद्यकीय आरोग्य सभापती  मनिषा अतकरे, अतिरिक्त आयुक्त (शहर) अंकित, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, भेलचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज कुमार शाह, वित्त व्यवस्थापक पवन अग्रवाल, वरिष्ठ कार्यकारी प्रवीण कुजूर, मनपाचे नगरसेविका माधुरी फुलसुंगे, नगरसेविका योगिता तेलंग, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, झोनल अधिकारी डॉ. अतिक खान तसेच संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नागपूर महानगरपालिकेच्या महापौर  निता ठाकरे यांनी भेल कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्य सेवेला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भेलच्या सीएसआर उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या ५१ शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC) तसेच १०२ शहरी आरोग्य व आरोग्यवर्धिनी केंद्रांना (UHWC) ही औषधे नि: शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये रक्तदाब नियंत्रणासाठी Amlodipine व Telmisartan तसेच मधुमेहासाठी Glimepiride व Metformin या औषधांचा समावेश आहे. यावेळी भेलचे वरिष्ठ व्यवस्थापक मनोज कुमार शाह यांच्या हस्ते सुमारे 5 लाख रुपयांच्या औषधांची वैद्यकीय मदत उपलब्ध करण्यात आली. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना आवश्यक औषधे सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी उपक्रमाबाबत प्राथमिक माहिती दिली. तसेच भेल कडून आरोग्य विभागाला मिळणाऱ्या सहकार्याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.