spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पळून गेलेली मुलगी परत आणण्याचा दावा करणाऱ्या ढोंगी बाबाचा ‘अंनिस’कडून पर्दाफाश

– १०० रुपयांच्या स्टॅम्पवर दिली होती लेखी गॅरंटी!

– अड्याळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या; पिंपळगाव (नि.) येथील घटना, लाखांची फसवणूक उघड

हंसराज भंडारा :- भंडारा जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धेचा बाजार मांडून बसलेल्या एका ढोंगी बाबाचे पितळ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) उघडे पाडले आहे. पळून गेलेली मुलगी ‘मोहिनी’ विद्येच्या जोरावर शंभर टक्के परत आणून देतो, असा दावा करत भाविकांची फसवणूक करणाऱ्या हेमदास किसन बावणे (वय ५५) या ढोंगी बाबाला अड्याळ पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे या बाबाने चक्क १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणून देण्याची लेखी ‘गॅरंटी’ दिली होती.

कीर्तन-प्रवचनाच्या आडून जादूटोण्याचा व्यवसाय पिंपळगाव (नि.) येथील रहिवासी असलेला हेमदास बावणे हा परिसरात कीर्तन आणि प्रवचनकार म्हणून ओळखला जात असे. मात्र, या धार्मिक कार्याचा आडोसा घेत तो लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेत होता. जमिनीतील सोने काढून देणे आणि घराबाहेर पळून गेलेल्या मुलींना मोहिनी मंत्राद्वारे परत बोलावणे, असे दावे तो करत होता. यासाठी तो सुरुवातीला ७,५०० ते ८,००० रुपये रोख, एक पायली तांदूळ आणि पाण्याची बाटली घेत असे. तसेच काही वनस्पतींची ‘चुंबळ’ तयार करून मुलीच्या आंघोळीच्या पाण्याखाली ठेवण्यास सांगत असे.

मुलीच्या जीवाचे भय दाखवून उकळला १ लाख रुपये

शिवशंकर रामकिसन डोरले यांची मुलगी एका मुलाच्या प्रेमात पडल्याने घरी नीट राहत नव्हती. त्यांनी आपली व्यथा बावणे बाबाला सांगितली. बाबाने ‘मोहिनी’ करण्याचा दावा करत त्यांच्याकडून ८,००० रुपये घेतले. मात्र, मुलगी थांबली नाही आणि तिने प्रेमविवाह केला. मुलगी घर सोडून गेल्यावर हतबल झालेले डोरले पुन्हा बाबाकडे गेले. तेव्हा या ढोंगी बाबाने “मोठी मोहिनी करावी लागेल” असे सांगून १ लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास उशीर झाल्यावर “तुझी पोरगी मरेल किंवा तिला काहीतरी होईल” अशी भीती त्याने दाखवली. शेवटी २३/३/२०२५ रोजी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर “तुमची मुलगी शंभर टक्के परत येईल” असे लिहून देऊन १ लाख रुपये उकळले.

अंनिस’चा सापळा आणि भोंदूपणाचे दर्शन

मुलगी परत न आल्याने डोरले यांनी पैसे परत मागितले, पण बाबाने उलट धमकी दिली. अखेर डोरले यांनी ‘अंनिस’कडे धाव घेतली. अंनिसचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे आणि त्यांच्या पथकाने रचलेल्या सापळ्यात हा बाबा सहज अडकला. लोणारे यांनी “माझी मुलगी दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली आहे” अशी खोटी तक्रार बाबाकडे केली. बाबाने त्यांना ओळखले तर नाहीच, उलट ७,५०० रुपयांची मागणी करत गॅरंटी दिली. लोणारे यांना प्रत्यक्षात मुलगीच नाही, हे देखील त्या ‘त्रिकालदर्शी’ बाबाला ओळखता आले नाही.

अड्याळ पोलिसांची कारवाई घटनेचे गांभीर्य ओळखून अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनंजय पाटील यांनी अंनिस कार्यकर्त्यांच्या सहकार्याने बाबाच्या दरबारावर छापा टाकला. पोलिसांनी हेमदास बावणे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३१८ (४) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ च्या कलम ३(२) नुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

या मोहिमेत अंनिसचे विष्णुदास लोणारे, नितेश बोरकर, नरहरी नागलवाडे, चंद्रशेखर भिवगडे, पुरुषोत्तम गायधने यांनी सक्रिय सहभाग घेतला. अशा फसव्या बाबांपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.