spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शिवानी दाणी-वखरे आणि शेषराव गोतमारे यांनी स्वीकारला एनआयटी विश्वस्त पदाचा कार्यभार

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि नगरसेवक शेषराव गोतमारे यांनी सोमवारी (ता. ११) नागपूर सुधार प्रन्यास च्या (एनआयटी) विश्वस्त पदाचा कार्यभार स्वीकारला. नागपूर सुधार प्रन्यास येथे आयोजित छोटेखानी पदग्रहण समारंभात महापौर निता ठाकरे आणि जिल्हाधिकारी तथा एनआयटी प्रभारी सभापती कुमार आशीर्वाद यांनी दोन्ही नवनियुक्त विश्वस्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाला उपमहापौर लीला हाथीबेड, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी आमदार प्रा. अनिल सोले, डॉ. मिलिंद माने, माजी महापौर दयाशंकर तिवारी, परिवहन समिती सभापती मंगला खेकरे, क्रीडा समिती सभापती दर्शनी धवड, महिला व बालकल्याण समिती सभापती सारिका नांदूरकर, जलप्रदाय समिती सभापती दिव्या धुरडे, कर आकारणी व कर संकलन समिती सभापती सरिता कावरे, जलप्रदाय समिती उपसभापती पिंटू झलके, शिवसेना गटनेते गणेश चर्लेवाल, नगरसेवक योगेश पाचपौर, नगरसेविका सुषमा चौधरी, अभिरुची राजगीरे, भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. संजय भेंडे यांच्यासह इतर नगरसेवक व नगरसेविका प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नवनियुक्त विश्वस्त शिवानी दाणी-वखरे यांनी, पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास दाखवून या पदावर नियुक्ती केल्याबद्दल आभार मानले. पक्षाने माझ्यावर जी मोठी जबाबदारी सोपविली आहे, त्या संधीचे सोने करून नागरिकांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे त्या म्हणाल्या. तसेच, एनआयटीमधील प्रलंबित प्रश्न, गोंड राजे समाधी, दीक्षाभूमीचा विकास आणि अनधिकृत ले-आउटचे व इतर रखडलेले विषय मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी नमूद केले.

नवनियुक्त विश्वस्त शेषराव गोतमारे यांनीही पक्षाचे आभार मानले. विश्वस्त पदाची जी जबाबदारी पक्षाने सोपविली आहे, तिला कटिबद्ध राहून मी माझे कर्तव्य पार पाडेन. एनआयटीमधील अनधिकृत ले-आउटसह इतर महत्त्वाचे प्रश्न सोडविण्याला माझे प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले. औपचारिक पदग्रहण सोहळ्यासाठी एनआयटी कार्यालयात भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी या नियुक्तीचे उत्साहात स्वागत केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.