– विदयार्थी – पालक हक्क संघर्ष समितीचे संजय रणदिवे यांचा विरोध
नागपूर सुधार प्रन्यासने सामान्य जनतेसाठी वाठोडा येथे बांधलेल्या 396 गाळयांच्या योजनेला जनतेने प्रतिसाद न दिल्याने आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ही इमारत विकत घेवून त्यात नवीन वसतिगृह प्रस्तावित केले आहे. या भागात विदयार्थ्यांना वाहतूकीची योग्य सोय नाही. रस्त्याचे व्यवस्थित जाळे नाही. शिवाय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अध्यादेशानुसार सोय करता येत नसल्याने शहरातील 5095 विदयार्थी सध्या स्वाधार योजनेचा लाभ घेत आहेत. याठिकाणी प्रश्न हा उद्भवतो की, नागपूर सुधार प्रन्यासने ही योजना नागरिकांच्या घरांसाठी प्रस्तावित केली होती, तेव्हा त्याचा उपयोग वसतिगृहासाठी कसा केला जावू शकतो ? वसतिगृहाची रचनाच वेगळी असते हे या विभागाचे लक्षात येत नाही का ? की, यामधे कोणाचा दबाव काम करीत आहे. या 396 गाळयांमधे 5095 विदयार्थ्यांची सोय होवू शकणार आहे का ? एका गाळयात जास्तीत जास्त 6 विदयार्थी जरी ठेवले तरी फक्त अंदाजे 2400 विदयार्थ्यांची सोय करता येवू शकते. अशा वेळी गावाच्या बाहेर अशी इमारत घेण्यास विभागाने कशी काय मंजूरी दिली ? दुसरीकडे शहराच्या बाहेरिल भागात असल्याने व वाहतूकीची सोय नसल्याने विदयार्थी या प्रस्तावित वसतिगृहाला प्रतिसाद देतील का ? या सर्व पार्श्वभूमीवर विदयार्थी-पालक हक्क संघर्ष समितीचे संजय रणदिवे यांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. सध्या उन्हाळी सुटया सुरू असल्याने विदयार्थी आपापल्या गावात आहेत. ते आल्यानंतर या विरोधात आंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. याठिकाणी आणखी एक बाब निदर्शनास आणून देण्याची गरज आहे की, नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेल्या बहुसंख्य गाळयांसाठी असलेल्या अटी- शर्तीमुळे हे गाळे तसेच पडून राहत असल्याची ही काही पहिलीच घटना नाही. अशा वेळी याची विल्हेवाट लावण्याची देखील ही योजना आहे. पण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यावेळी सर्व अंगाने विचार केल्याचे दिसत नाही.