नागपूर :- पश्चिम आशियाई खंडात वाढत्या संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेले इंधन संकट पाहता, देशात इंधन बचतीसाठी कडक पावले उचलली जात आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार, नागपूर शहरात आता प्रशासकीय स्तरावर मोठ्या काटकसरीच्या उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.
नागपूरच्या महापौर निता ठाकरे यांनी मनपा आयुक्त डॉ. विपीन यांना पत्र लिहून महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी तातडीने ‘फ्युएल सेव्हिंग’ नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन केले आहे की माननीय पंतप्रधान यांचा आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा वापर करावा. त्यांनी इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.
मनपाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक/दोन दिवस आपल्या खाजगी किंवा शासकीय गाड्यांचा वापर टाळून ‘आपली बस’ किंवा ‘नागपूर मेट्रो’ने प्रवास करणे आवश्यक आहे. तसेच वाहनांचा वापर ऑड/इवन दिवस करण्यात आला तर याचा फायदा होऊ शकतो.
एकाच भागात राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गाड्यांऐवजी एकाच गाडीतून कार्यालय गाठावे, जेणेकरून पेट्रोल-डिझेलची बचत होईल.
शासकीय दौऱ्यांवेळी वाहनांचा अनावश्यक ताफा कमी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, या निर्णयाची अंमलबजावणी केवळ कागदावर नसून महापौर स्वतः अंमलात आणत आहेत. नुकत्याच झालेल्या अंबाझरी आणि नाईक तलाव पाहणी दौऱ्यात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती यांनी एकाच गाडीने प्रवास करून ‘कार पुलिंग’चा आदर्श घालून दिला आहे. “राष्ट्रीय संकट समयी इंधनाचा थेंब अन् थेंब वाचवणे हे आपले कर्तव्य आहे. नागपूर महानगरपालिका या मोहिमेत पुढाकार घेऊन संपूर्ण राज्यासमोर एक उदाहरण ठेवेल,” असे महापौरांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
महापौरांनी सर्व विभागांना याचे परिपत्रक जारी करण्याचे आवाहन आयुक्तांना केले आहेत.