किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील सुर नदीलगत असलेल्या ग्रामपंचायतींनी तीव्र उन्हाळा लक्षात घेता पेंच चे पाणी सुर नदी सोडण्याची मागणी केली होती. याबाबतचे लेखी निवेदन त्यांनी शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे यांच्याकडे सोपविले होते. भुरे यांनी ते निवेदन घेऊन नुकतेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे पेचचे पाणी सोडण्याची मागणी केली होती व त्याबाबत सतत पाठपुरावाही केला होता. मंत्री जयस्वाल यांनी तातडीने याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लेखी व भ्रमणध्वनी वरून तात्काळ याबाबत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत हिंदी व मराठी दैनिकांमध्ये वृत्तही प्रकाशित झाले होते.सदर वस्तुस्थिती लक्षात घेऊन पेंच प्रकल्पाच्या खिंडसी धरणातून अखेर आज शुक्रवार (ता. 15 एप्रिल) ला दुपारी ४.०० वाजता २५ क्यूसेक्स पाणी नदीत पात्रात सोडण्यात आले आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता पेंच पाटबंधारे विभाग कार्यालयाने दिली आहे व ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेली आहे.
नदी काठावरील गावांना तसेच नदीपात्रातून आवा-गमन करणाऱ्या सर्व संबंधीतानी स्वतः ची काळजी बाळगावी असा सतर्कतेचा इशारा गावपातळीवर देण्यात आला आहे.
सध्यस्थितीत धरणाची पाणी पातळी ३१४.९५ मी आहे. धरणाचा जिवंत साठा ६८.९५६ दलघमी असून टक्केवारी ६६.८८ आहे.
सुर नदीच्या काठावर स्थित नळ योजनेच्या विहिरी असणाऱ्या व पेच चे पाणी सोडण्याची लेखी निवेदन देऊन मागणी करणाऱ्या व मागणी न करणाऱ्याही ग्रामपंचायतींनी, शेतकऱ्यांसह समस्त ग्रामस्थांनी राज्यमंत्री आशिष जयस्वाल ,पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ,शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे यांचे आभार मानले आहे.