हंसराज,भंडारा :- भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात भव्य ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत पाण्यातून बाहेर पडणार नाही, अशी ठाम भूमिका पटोले यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली असून, जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आंदोलकांशी चर्चा केली, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही.
प्रमुख मागण्यांचा तगादा या आंदोलनाच्या माध्यमातून नाना पटोले यांनी सरकारसमोर मागण्यांचा पाढा वाचला. यामध्ये प्रामुख्याने:
🔹भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट ४० लक्ष क्विंटलने वाढवून मिळावे.
🔹 शेतीसाठी दिवसा १६ तास अखंडित वीजपुरवठा करावा.
🔹 जातीनिहाय जनगणना करून ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम असावा.
🔹 शेतकऱ्यांना धानासाठी तातडीने बोनस जाहीर करावा.
🔹 गोसेखुर्द आणि इतर प्रकल्पांमधील पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढून विस्थापितांना योग्य मोबदला द्यावा. 🔹 भेल (BHEL) आणि रोहणा पावर प्लांटसाठी घेतलेल्या जमिनींचा वापर करावा किंवा त्या जमिनी शेतकऱ्यांना परत कराव्यात.
सरकारच्या योजनांवर कडाडून टीका आंदोलनादरम्यान नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांच्या अपयशावर बोट ठेवले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘हर घर नल, हर घर जल’ ही योजना पूर्णपणे फसली असून गावोगावी रस्ते खोदून ठेवले आहेत, पण नळाला पाणी नाही. ही केवळ ‘फेकगिरी’ असून डबल इंजिन सरकार सर्व आघाड्यांवर फेल झाले आहे,” अशी टीका त्यांनी केली. तसेच, काँग्रेसच्या काळात धान खरेदीला कोणतीही मर्यादा नव्हती, मात्र आता सरकारने मर्यादा घालून शेतकऱ्यांची कोंडी केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आंदोलनाची तीव्रता पाहून जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. “सर्व प्रश्न सोडवले जातील, तुम्ही कृपया पाण्यातून बाहेर या,” अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केली. मात्र, नाना पटोले यांनी “केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी,” असे म्हणत रात्रभर पाण्यातच राहण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनात महिला पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दिग्गजांची उपस्थिती या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भंडारा-गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरचे खासदार नामदेवराव किरसाण, जिल्हा परिषद अध्यक्षा कविता उईके, माजी खासदार शिशुपाल पटले, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला जिल्हाध्यक्ष जयश्री बोरकर आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर आता सरकार या मागण्यांची दखल घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.