◼️शेतकऱ्यांना सुलभ रस्ते सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज..
◼️राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा अधिकाऱ्यांना कडक संदेश…
सचिन चौरसिया, रामटेक :- रामटेकातून सुरू झालेली मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना राज्यासाठी आदर्श ठरली आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रात पंचायत समिती व जिल्हा परिषदमार्फत होत असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत राज्यमंत्री अॅड. आशीष जयस्वाल यांनी मंगळवारी त्यांच्या येथील जपसंपर्क कार्यालयात आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांना सुलभ रस्ते, सुविधांसाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगून कामातील पारदर्शकता व दर्जाबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले. याबैठकीला उपविभागीय अधिकारी प्रयेश महाजन, रामटेक पंचायत समिती गटविकास अधिकारी जयसिंग जाधव,पारशिवणी पंचायत समिती गटविकास अधिकारी सुभाष जाधव, दोन्ही पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे शाखा अभियंते उपस्थित होते. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषांनुसार एका किलोमीटर रस्त्यासाठी तब्बल ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र आपण सुलभ पद्धतीचा अवलंब करत एकाच तंत्रज्ञाला २५ किलोमीटरचे काम देत आहोत. संबंधित तंत्रज्ञाकडे जेसीबी, रोलर, वायब्रेटर रोलर, टिप्पर, पोकलेन यांसारखी सर्व यंत्रसामग्री उपलब्ध असल्यामुळे काम अधिक वेगाने, दर्जेदार आणि कमी खर्चात होत आहे. त्यामुळे शासनाचाही पैसा वाचत असून केवळ ६ ते ८ लाख रुपये प्रति किलोमीटर खर्चात उत्तम दर्जाचे रस्ते उभारले जात आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्लोप, पाण्याचा योग्य उतारा तसेच कॉलर पाईपची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रात ही कामे दर्जेदार व पारदर्शक पद्धतीने व्हावीत यासाठी आज अधिकाऱ्यांना अत्यंत प्रामाणिकपणे काम करण्याची शपथ देण्यात आली. अन्नदाता बळीराजा आयुष्यभर कष्ट करून समाजाला अन्न पुरवतो. रक्ताचं पाणी करून, हाडाची काडं करून तो शेती करतो. त्यामुळे ही योजना त्याच्या कल्याणासाठी असून कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही. ही योजना प्रथम रामटेक विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आली आणि नंतर राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. “बळीराजा” हे नाव देण्यासाठी मी विशेष आग्रह धरला होता. आज ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. हे काम म्हणजे आभाळ शिवण्यासारखे मोठे कार्य आहे. मात्र कुठेतरी सुरुवात करावीच लागते. आपण ती सुरुवात केली असून निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास यावेळी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला. या बैठकीत कनिष्ठ अभियंता जि. प. बांधकाम उपविभाग रामटेक लोकेश बनकर, कनिष्ठ अभियंता पं. स. पारशिवणी रोहित चरपे, शाखा अभियंता जि. प. बांधकाम एस. एम. मडावी, कनिष्ठ अभियंता पं. स. रामटेक मनोहर जाधव, कनिष्ठ अभियंता पं. स. पारशिवणी संजय सावरकर, रणजीत भगत, रंजन धनविजय, एन. एस. रामटेके, विनोद भोगे सह संबंधित अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
योजनेला सहकार्याचे आवाहन
दिवंगत माझी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मागील अर्थसंकल्पात ‘रामटेक पॅटर्न’ राज्यभर राबविण्याची घोषणा केली होती. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या योजनेचे पालकत्व स्वीकारले आहे. असे सांगून योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आभार मानले. राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी बांधवांनी ही योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
….. तर शेतकऱ्याची आयडी ब्लॉक
कोणत्याही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करू नये, असेही आवाहन करण्यात आले. अतिक्रमण करणाऱ्यांचा फार्मर आयडी ब्लॉक करण्यात येईल. त्यांना बोनस, विमा, वीजबिलावरील अनुदान, अतिवृष्टी किंवा दुष्काळातील मदत तसेच एनडीआरएफची मदत मिळणार नाही.