◼️हातपंप टाकणार कात
◼️देखभाल, दुरुस्तीसाठी हातपंपांची संख्या पाठविण्याचे ग्रामपंचायतीना
रामटेक :- तालुक्यात उन्हाचे चटके दिवसेंदिवस वाढत आहेत. मे संपायला दोन आठवड्याचा अवधी आहे. वाढत्या उन्हासोबतच काही टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. उन्हाळ्यात पारा ४२ ते ४५॰ सेल्सिअसवर पोहोचला असून नदी, नाले, विहीरी कोरडे होण्याची चिन्हे दिसत आहेत. जुन महिना अद्याप बाकी आहे. तेव्हा भिषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्यापुर्विच जिल्हा परिषदेने पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतींना हातपंपाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी त्यांच्या संख्यांचे विवरण मागीतले आहे. यामुळे गावातील हातपंप नेहमी सुरू राहण्याची चिन्हे दिसून लागली आहेत. जिल्हा परिषदेने नेमलेली यंत्रणा ( कंत्राटी ) हे काम करणार आहे. पंचायत समितीकडून प्राप्त माहितीनुसार वर्षभरात एका हातपंपाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी वर्षभरासाठी दोन हजार पाचशे रुपये ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेला द्यावे लागणार आहे. एखाद्या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दहा हातपंप असेल तर ग्रामपंचायतलावर्षाकाठी पंचेविस हजार रुपये जिल्हा परिषदेला द्यावे लागणार आहे. या पैशातही यंत्रणा वर्षभर हातपंपांची देखभाल दुरुस्ती करणार आहे. हा निर्णय ग्रामपंचायतींसाठी ऐच्छीक असला तरी, उन्हाची तीव्रता बघता ग्रामपंचायतीने हातपंपाची देखभाल, दुरुस्ती करून घेणे, योग्यच राहील असे मत व्यक्त केले जात आहे. जिल्हा परिषदेने २०२६-२७ करीता पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायत क्षेत्रातील हातपंपाची संख्या मागितली आहे.
पर्यायी उपाय म्हणून हातपंप दुरुस्त व सुरू ठेवणे गरजेचे
ग्रामीण भागात बऱ्याच ग्रामपंचायतींनी अंतर्गत गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी असणाऱ्या विहिरी, नदी, नाल्यामध्ये किंवा त्याच्याजवळ खोदलेल्या आहेत. त्या विहिरीतून संबंधित ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या तापमानामुळे नदी, नाले कोरडे झाले आहेत. विहिरींची पाणी पातळी कमी झाली आहे. पर्यायी उपाय म्हणून हातपंप दुरुस्त व सुरू ठेवणे गरजेचे आहे, असे मत अनेक गावांतील नागरिकांनी व्यक्त केले आहे.