◼️उदयसिंग उर्फ गजू यादव करणार आंदोलनाचे नेतृत्व
सचिन चौरसिया, रामटेक :- तालुक्यातील रामटेक -संग्रामपूर -कचुरवाही मुख्य जिल्हा रस्त्यावरील पेंच कालवा येथील पुलाचे बांधकाम गेल्या एक वर्षापासून अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे आणि प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. १९ मे ला दुपारी २ दोन वाजता पेंच पाटबंधारे विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहित भाजप नागपूर जिल्हा (रामटेक ग्रामीण) उपाध्यक्ष उदय सिंग उर्फ गज्जू यादव यांनी दिली आहे. मार्गावरील पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असून कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो. सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या वर्षभरापासून हा पूल बंद आहे, त्यामुळे चिंचाळा, हमलापुरी, संग्रामपूर, कचूरवाही आणि लोहडोंगरी यांसारख्या अनेक गावांतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त ८ ते १० किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी ३.५० कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली होती. राज्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र पेंच पाटबंधारे विभागाच्या संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडून या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यादव यांनी केला आहे. प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे जनतेला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने आता लोकशाही मार्गाने आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नाही,’ असे उदयसिंग यादव यांनी सांगितले. आंदोलनाची माहिती तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.