– २० तासांच्या शोधमोहिमेनंतर जितेंद्र यांचा मृतदेह सापडला; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन हलले
हंसराज, भंडारा बेटाळा :- मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे वैनगंगा नदी पात्रात घडलेल्या एका काळजाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेत दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. नदीत बुडणाऱ्या १७ वर्षीय बालकाचा जीव वाचविण्यासाठी धाडसाने उडी घेणाऱ्या जितेंद्र सहादेव भुरे (वय ३२) या तरुणाचाही पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. बालकाचा मृतदेह कालच सापडला होता, मात्र जितेंद्र यांचा मृतदेह २० तासांच्या अथक परिश्रमानंतर आज शोधण्यात यश आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बेटाळा परिसरावर शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय? १६ मे रोजी सायंकाळच्या सुमारास बेटाळा येथील नैतिक किशोर ठवकर (वय १७) हा तरुण वैनगंगा नदीच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने नैतिक खोल पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी जवळच असलेल्या जितेंद्र सहादेव भुरे यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. मात्र, नशिबाने साथ दिली नाही आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात जितेंद्र हे देखील पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणेने तातडीने शोधमोहीम राबवून नैतिक ठवकर याचा मृतदेह कालच बाहेर काढला होता. मात्र, जितेंद्र भुरे यांचा मृतदेह सापडत नसल्याने कुटुंबासह ग्रामस्थांची चिंता वाढली होती.
खासदारांचा रुद्रावतार आणि प्रशासनाचे कान टोचले जितेंद्र यांचा मृतदेह १९ तास उलटूनही मिळत नसल्याने आणि प्रशासकीय यंत्रणा संथ गतीने काम करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांमध्ये संताप होता. ही माहिती मिळताच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून खासदार पडोळे स्वतः मोहाडीच्या तहसीलदार यांच्यासह वैनगंगा नदीच्या पात्रात उतरले. त्यांनी शोधकार्याची पाहणी करत जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शोधमोहीम युद्धपातळीवर राबविण्याचे निर्देश दिले. “प्रशासनाने केवळ औपचारिकता न करता संपूर्ण यंत्रणा लावून मृतदेह बाहेर काढावा,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
अखेर २० तासानंतर शोधमोहीम यशस्वी खासदारांच्या सूचनेनंतर यंत्रणा अधिक गतिमान झाली. स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाच्या मदतीने अखेर २० तासांच्या शोधकार्यानंतर जितेंद्र भुरे यांचा मृतदेह हाती लागला. मृतदेह बाहेर काढताच त्यांच्या कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. या दोन्ही मृतांची कुटुंबे अत्यंत सामान्य परिस्थितीतील असून, घरातील तरुण मुलांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुटुंबियांचे सांत्वन आणि मदतीचे आश्वासन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दोन्ही शोकाकुल कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय आर्थिक मदत आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद भंडाराचे सभापती नरेश ईश्वरकर, केशव शेंडे, कार्तिक ईश्वरकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दुसऱ्याचा जीव वाचविताना स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या जितेंद्र भुरे यांच्या या बलिदानाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.