spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तीव्र उष्णतेच्या लाटेबाबत नागरिकांसाठी पूर्वसूचना, जनजागृती व आरोग्य सुरक्षा उपाययोजना

नागपूर :- भारतीय हवामान विभागाने (IMD) नागपूर व संपूर्ण विदर्भ क्षेत्रासाठी पुढील काही दिवस तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, तापमान ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका प्रशासनाने “हीट अ‍ॅक्शन प्लॅन २०२६” अंतर्गत शहरातील नागरिकांचे उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी व्यापक स्तरावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्व विभागांना समन्वयाने कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सतर्क ठेवण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी दिली आहे.

दिनांक १ मार्च २०२६ ते १७ मे २०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या विविध आरोग्य संस्थांमार्फत एकूण ३,२८,७१२ नागरिकांची ओपीडी तपासणी व आरोग्य निरीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये UPHC अंतर्गत १,६१,९९८, UHWC अंतर्गत १,३५,७१३, महानगरपालिका रुग्णालयांमध्ये ९,२७३ तसेच “आपला दवाखाना” अंतर्गत २१,७२८ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अशी माहिती साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.

उष्णतेशी संबंधित आजारांच्या निरीक्षणामध्ये आतापर्यंत Heat Rash चे ३६, Heat Exhaustion चे २०, Heat Cramps चे १४ तर Heat Syncope चे ६ असे एकूण ७६ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे अद्याप एकही Heat Stroke रुग्ण नोंदविण्यात आलेला नाही. ही बाब महानगरपालिकेच्या पूर्वतयारी, सक्रिय सर्वेक्षण व तातडीच्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दर्शविते.

उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी शहरातील प्रमुख रुग्णालयांमध्ये ११ विशेष “कोल्ड वॉर्ड” सुरू करण्यात आले आहेत. येथे आवश्यक औषधे, IV Fluids, Ice Packs, ORS तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. तसेच शहरातील १५० पेक्षा अधिक शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रे (UPHC), हेल्थ अ‍ॅण्ड वेलनेस सेंटर, दवाखाने व महानगरपालिका रुग्णालये उष्णतेशी संबंधित किरकोळ आजारांवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नागपूर महानगरपालिकेने विशेषतः उघड्यावर राहणारे बेघर, भिक्षेकरी, मानसिक आजारी व भटक्या नागरिकांना उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत आतापर्यंत १४० पेक्षा अधिक व्यक्तींना कायमस्वरूपी निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.

“हीट अ‍ॅक्शन प्लॅन” अंतर्गत विविध विभाग, संस्था व यंत्रणांच्या सहकार्याने अनेक महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महा मेट्रो प्रशासनामार्फत मेट्रो स्थानकांवर जनजागृती संदेश, डिजिटल डिस्प्ले, घोषणा प्रणाली तसेच पिण्याचे पाणी व ORS सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रमुख बस स्थानके, सार्वजनिक वाहतूक केंद्रे व गर्दीच्या भागांमध्ये उष्णतेबाबत सावधानता संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.

कामगार विभागामार्फत बांधकाम संस्था, उद्योग, कारखाने व इतर कामगार संबंधित आस्थापनांना कामाच्या वेळांमध्ये बदल, दुपारच्या वेळेत विश्रांती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व उष्णतेपासून संरक्षणाबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. उद्यान विभागामार्फत शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व वाहतूक सिग्नल परिसरात हिरव्या शेड नेटची उभारणी करण्यात आली आहे.

नागरिकांना उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळावा यासाठी शहरातील विविध उद्यान व हिरवळयुक्त बागा दुपारच्या वेळेतही प्रवासी, पादचारी, हॉकर्स, कामगार व प्रवाशांसाठी खुल्या ठेवण्यात आल्या आहेत. वाहतूक विभागामार्फत शहरातील ३१ प्रमुख वाहतूक सिग्नल दुपारच्या वेळेत “ब्लिंकर मोड” वर ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना दीर्घकाळ उन्हामध्ये थांबावे लागू नये व उष्णतेचा त्रास कमी व्हावा.

नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे, भरपूर पाणी, लिंबूपाणी, ताक, ORS यांचे सेवन करावे तसेच हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना डोक्यावर टोपी, कॅप किंवा छत्रीचा वापर करावा. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी.

जर एखाद्या व्यक्तीस चक्कर येणे, उलटी होणे, जास्त ताप येणे, गोंधळलेली अवस्था, तीव्र अशक्तपणा किंवा बेशुद्धी अशी लक्षणे जाणवत असल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.नागपूर महानगरपालिका सर्व नागरिकांना विनंती करते की, उष्णतेच्या या तीव्र परिस्थितीत स्वतःची तसेच इतरांची काळजी घ्यावी, विशेषतः गरजू व असुरक्षित नागरिकांना मदत करावी आणि प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी दिली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.