spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कमी खर्चात अधिक उत्पादनाचा मंत्र; कोरचीत ‘सगुणा भात शेती तंत्रज्ञान’ प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

– शिकारी टोला येथे कृषी विभागाचा पुढाकार; पाण्याची बचत, मजुरीत कपात आणि उत्पादनवाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

गडचिरोली :- तालुका कृषी विभाग, कोरची यांच्या वतीने मौजे शिकारी टोला येथे ‘सगुणा भात लागवड तंत्रज्ञान’ (SRT) या आधुनिक आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतीचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. पारंपरिक भात शेतीच्या तुलनेत कमी खर्च, कमी मजुरी आणि अधिक उत्पादन देणाऱ्या या तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दुर्गम आणि आदिवासी भागातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या उत्पादनात आणि आर्थिक उत्पन्नात वाढ करणे हा होता. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाचे फायदे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीची पद्धत सविस्तरपणे समजावून सांगितली.

या तंत्रज्ञानामध्ये पारंपरिक पद्धतीप्रमाणे नांगरणी व चिखलणी करण्याची आवश्यकता नसते. कायमस्वरूपी गादीवाफे तयार करून त्यावर टोकण पद्धतीने भात लागवड केली जाते. त्यामुळे मशागत खर्चात मोठी बचत होते. तसेच जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहिल्यामुळे पाण्याची तब्बल ५० टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. पिकांची मुळे अधिक खोलवर विकसित होत असल्याने झाडे मजबूत बनतात व रोगप्रतिकारक क्षमता वाढते. परिणामी उत्पादनात लक्षणीय वाढ होण्यास मदत मिळते.

यावेळी तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी सांगितले की, “सगुणा भात लागवड तंत्रज्ञान ही काळाची गरज असून या पद्धतीमुळे मशागत, डिझेल, मजुरी आणि वेळेच्या खर्चात ३० ते ४० टक्क्यांहून अधिक बचत होते. कोरची तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करून उत्पादनवाढीसोबतच आपले आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

प्रात्यक्षिकादरम्यान कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष शेतात गादीवाफे तयार करण्याची पद्धत, टोकण यंत्राचा वापर तसेच आंतरमशागतीची प्रक्रिया शेतकऱ्यांना करून दाखवली. शिकारी टोला आणि परिसरातील गावांमधून आलेल्या महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध तांत्रिक बाबींबाबत शंका विचारून मार्गदर्शन घेतले.

कार्यक्रमास प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मसराम, गुण नियंत्रण अधिकारी पाथोडे, बीटीएम टेंभुर्णे, कृषी सेवक डोंगरवार, गावचे सरपंच, प्रगतशील शेतकरी तसेच शिकारी टोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाच्या या उपक्रमाबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत यंदाच्या खरीप हंगामात सगुणा भात लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.