spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जिल्ह्यात 6,836 शेत पाणंद रस्त्यांचे नियोजन

– जिल्हाधिकारी विकास मीना यांची माहिती

Ø मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती

Ø अंदाजे 1502 कोटी रुपये खर्च लागणार

Ø एकूण 11 हजार 540 किमी लांबीचे रस्ते निश्चित

 यवतमाळ :- ग्रामीण भागातील शेत व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण करून वाहतुकीस चालना देण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या “मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना” अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कामांना गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सातही विधानसभा क्षेत्रांमध्ये एकूण 6 हजार 836 शेत पाणंद रस्ते निश्चित करण्यात आले असून सुमारे 11 हजार 540 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी अंदाजे 1502.88 कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याची माहिती मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने पाच वर्षात टप्प्याटप्प्याने व जलद गतीने पूर्ण करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन, जिल्हा नियोजन, खनिज प्रतिष्ठानकडून निधी उपलब्ध केला जाणार असून त्यामाध्यमातून शेत पाणंद रस्त्यांची कामे केली जाणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती तसेच विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 13 समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.

योजनेसाठी विविध यंत्रसामुग्री व पाईप पुरवठ्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हास्तरीय कार्यकारी समितीमार्फत विधानसभा मतदारसंघनिहाय दर निश्चित करण्यात आले असून 53 निविदाधारकांपैकी 52 निविदाधारकांनी कमी दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांच्या संमतीपत्राच्या आधारे पात्र कंत्राटदारांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय रस्त्यांच्या संख्येनुसार यवतमाळ विधानसभा क्षेत्रात 1753 किमी लांबीचे 1 हजार 113 रस्ते निश्चित करण्यात आले असून त्यासाठी अंदाजित रक्कम 262.95 कोटी रुपये, राळेगाव विधानसभा क्षेत्रात राळेगाव, कळंब व बाभुळगाव तालुक्यात 1850 किमी लांबीचे 1099 रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम 248.70 कोटी रुपये, आर्णी विधानसभा क्षेत्रातील आर्णी, केळापूर व घाटंजी तालुक्यातील 1580 किमी लांबीचे 672 रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम 221.20 कोटी रुपये, वणी विधानसभा क्षेत्रातील वणी व मारेगाव, झरीजामणी तालुक्यातील 2297 किमी लांबीचे 1662 रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम 342.66 कोटी रुपये, दिग्रसमध्ये विधानसभा क्षेत्रातील दिग्रस, दारव्हा व नेर तालुक्यातील 2344 किमी लांबीचे 1162 रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम 289.37 कोटी रुपये, पुसद विधानसभा क्षेत्रात 1211 किमी लांबीचे 876 रस्त्यांसाठी अंदाजित रक्कम 87.60 कोटी रुपये तर उमरखेड विधानसभा क्षेत्रातील उमरखेड व महागांव तालुक्यातील 504 किमी लांबीचे 252 रस्ते निश्चित करण्यात आले असून त्यासाठी अंदाजित रक्कम 50.40 कोटी रुपये लागणार आहेत. यासाठी निधीचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी दिली.

या मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्यांच्या कामांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेत पाणंद रस्ते मजबुत होणार असून शेती व्यवस्थेला चालना मिळणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.