कामठी :- निंबाजी सामाजिक कौशल्य विकास संस्था आणि अंशिता ब्युटी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत रांगोळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित विशेष कार्यक्रमात प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व हुशार आणि कलागुणसंपन्न महिला व युवा सहभागींना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. त्यांच्याच हस्ते सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ॲड. सुलेखा कुंभारे यांनी,अशा प्रकारचे कौशल्य विकास कार्यक्रम हे स्वावलंबन आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले एक कौतुकास्पद पाऊल आहे,” अशा शब्दांत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय कदम, आयोजिका स्वाती आशिष कावळे, आशिष कावळे आणि ॲड. रिणा गणवीर यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली.
या प्रशिक्षणामुळे महिलांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची संधी मिळाली असून, भविष्यात स्वयंरोजगाराच्या नवीन संधी शोधण्यासाठी याची मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.